पिंपळाने वेढलेलं झाकोबाचं ठाणं
सीविक मिरर ब्यूरो
वेशीवरची दैवते म्हणून म्हसोबा, रोकडोबा, झाकोबा यांचा उल्लेख लोकसंस्कृतीमध्ये केला जातो. त्यांना मान दिला की, कोणतंही कार्य निर्वघ्नपणे पार पडतं अशी पूर्वीच्या लोकांची श्रद्धा होती. आजही असे मानणारा मोठा वर्ग आहे. म्हसोबा, रोकडोबा यांची ठाणी (छोटे मंदिर) गावाबाहेरच असायची. पुण्यात कोथरूडमध्ये अशाच एका झाकोबाचं छोटं ठाणं आहे. पिंपळाच्या विशाल वृक्षाने वेढलेल्या या छोट्या मंदिराची दुरवस्था असून, त्याचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.
वेशीवरची दैवते म्हणून म्हसोबा, रोकडोबा, झाकोबा यांचा उल्लेख लोकसंस्कृतीमध्ये केला जातो. त्यांना मान दिला की, कोणतंही कार्य निर्वघ्नपणे पार पडतं अशी पूर्वीच्या लोकांची श्रद्धा होती. आजही असे मानणारा मोठा वर्ग आहे. म्हसोबा, रोकडोबा यांची ठाणी (छोटे मंदिर) गावाबाहेरच असायची. पुण्यात कोथरूडमध्ये अशाच एका झाकोबाचं छोटं ठाणं आहे. पिंपळाच्या विशाल वृक्षाने वेढलेल्या या छोट्या मंदिराची दुरवस्था असून, त्याचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.
पुणे शहराला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. वाडे, मंदिरे यांचं शहर अशीही पुण्याची ओळख आहे. पुणे हे एक वैशिष्टपूर्ण शहर आहे. मध्ययुगीन कालखंडात बऱ्हाणपूर, सुरतसारखी पुणे ही बाजारपेठ नव्हती की, नगर, औरंगाबादसारखं राजकीय महत्त्व असलेलं शहर नव्हतं. पुणे हा सुरुवातीला एक छोटा कसबा आणि नंतर जहागिरीचे ठिकाण म्हणून मानलं गेलं. मात्र, त्यानंतरच्या काळात या शहराचा झपाट्याने विकास झाला. १८व्या शतकातील हिंदुस्थानच्या राजकीय घडामोडीचे केंद्र अशी पुण्याची ओळख निर्माण झाली. याच काळात पुण्यात मोठे वाडे, गढ्या बांधल्या गेल्या. पेठा वसवल्या गेल्या. धार्मिक कार्यासाठी काही मंदिर बांधली गेली. त्यातच काही श्रद्धास्थाने निर्माण केली गेली. झाकोबा हे अशाच ठिकाणांपैकी एक ठाणं आहे.
कसबा गणपती, नागेश्वर महादेव, त्रिशुंड, जोगेश्वरी, तळ्यातील गणपती अशी अनेक मंदिरे पुण्यात आहे व त्यातील देवतांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या सगळ्या देवता प्रतिष्ठित असून, त्यांची पूजा अर्चा, नेवैद्य, आरती सगळं काही वेळेत करण्यासाठी तशी व्यवस्था लावण्यात आली आहे. मात्र, या दैवतांप्रमाणेच दुसरीही काही दैवते असतात त्यांना बऱ्याचदा ग्रामदेवता किंवा क्षेत्रपाल असे म्हटले जाते. त्यांच्या पूजेची व्यवस्था कोणीही करत असतं. कुळधर्म-कुलाचाराच्या वेळी त्यांना नैवेद्य दाखवला जातो. कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी त्यांना आधी मान दिला जातो.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, झाकोबा हा शिवगणांपैकी असलेल्या भैरवाचं एक रुप आहे. या देवतांच ठाण एखाद्या झाडाखाली असतं. तांदळाच्या रूपात किंवा मूर्तीच्या रूपात ही देवता असते. तिला अनेकदा शेंदरी रंगात रंगवलेलं असतं. शेतीच्या पिकाचं रक्षण करणे, घरामध्ये कुणाला बाहेरच्या बाधेचा त्रास असल्यास ती दूर करणे, भूतबाधा होऊ नये अशा गोष्टींसाठी या दैवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी मानपान दिला जातो. कोंबडं, बकरं कापणं अशा गोष्टी पूर्वी या दैवतांसमोर केल्या जात. अलीकडे हा प्रकार बऱ्यापैकी कमी झाला आहे.
मंदिराची स्थिती
पुण्यातील झाकोबाचं ठाणं कोथरूडमध्ये एका पिंपळाच्या मोठ्या झाडाखाली आहे. दगडी चिरांच बांधकाम असलेलं हे छोटं मंदिर आहे. दोन उभ्या खांबांवर पडझड झालेला कळस आहे. आतमध्ये घोड्यावर बसलेला आणि शस्त्र धारण केलेला झाकोबा दिसतो. मंदिराचं बांधकाम पुरातन असून, ते मंदिराची सद्यस्थिती पाहताच क्षणी लक्षात येतं. मंदिरांच्या चिऱ्यांना पिंपळाच्या मुळांनी आवळून धरलं आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी आणि अगदी गाभाऱ्याच्या आतपर्यंत या पिंपळाने आपले हात-पाय पसरले आहेत. या झाकोबाचं व पिंपळाच नातं खूप घट्ट असावं असं आपल्याला मंदिर पाहून वाटतं. मंदिराच्या बाहेर दोन पाच फुटाच्या वीरांच्या स्मारकशिळा आहेत. त्यापैकी एका शिळेवर चंद्र व सूर्य कोरले आहे. मंदिराची स्थिती पाहता या झाकोबाला पिंपळाने दिलेल्या अलिंगनाने त्याची गूढता आणखी वाढते. पिंपळाचं झाड कमी पडलं की, काय म्हणूनच त्यात कडुनिंबाच्या झाडानेही मंदिरावर अतिक्रमण केलेलं दिसत. हनुमान जयंतीला या झाकोबाची यात्री असते. उरुस सुरू होतो. त्याला ग्रामस्थांकडून मान-पान दिला जातो. अरिष्ट काही येऊ नये, याची प्रार्थना लोक करतात.
संवर्धनाची गरज
अशा प्रकारच्या पुरातन स्थळांचं जतन, संवर्धन आणि संरक्षण होण्याची गरज आहे. त्यामुळे नव्या पिढीला लोकसंस्कृती कळण्यात मदत होते. ऐतिहासिक वास्तू, वाडे मंदिरांचा अभ्यास केल्याने त्या काळातील नानाविध गोष्टी आणि ऐतिहासिक नमुने बघायला मिळतात. त्यांची माहिती नीटपणे पोहोचवल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यावर अभ्यास आणि संशोधन करता येतं. आपल्या देशाची आणि येथील मातीची संस्कृती म्हणून कृतज्ञ भावनेतून ऐतिहासिक वास्तूंचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे.
झाकोबाच्या बाहेर वीरगळ
झाकोबाच्या मंदिराबाहेर दोन वीरगळ आढळतात. वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जातात. कर्नाटक राज्यात मोठेमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात 'वीरगळ' असा शब्द प्रचलित झाला असावा. साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडांवर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यतः तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र-सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चंद्र, सूर्य तळपत आहेत, तोपर्यंत या वीरांच्या स्मृती कायम राहतील असे यातून सूचित करायचे असते. काही वीरगळ सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते. काही वीरगळांवर शिलालेखही असतात.
लोकदेैवत म्हसोबा
महाराष्ट्रात ग्रामदेवता किंवा लोकदेवता म्हणूनही म्हसोबाचा उल्लेख केला जातो. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा, या स्वरूपात तो गावोगावी आढळतो. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते. रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा इ. प्रसंगी त्याला बकरी, कोंबडी, नारळ इ. अर्पण करतात. ‘महिषासुर’ या सामासिक शब्दातील ‘महिष’ या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक ‘बा’ हा प्रत्यय जोडून ‘महिषोबा’ असा शब्द तयार झाला असावा आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘म्हसोबा’ हे रूप तयार झाले असावे. म्हसोबा ही मूळची अनार्य देवता असावी इ. मते अभ्यासकांनी मांडली आहेत. म्हसोबा हा भूतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ्य वेताळाइतके असते इ. प्रकारच्या श्रद्धा आढळतात. विदर्भ वगैरे भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करतात. तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते, अशी श्रद्धा आढळते. इतर घाणेवाल्यांना म्हसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख आढळतो. म्हसोबाच्या यात्रा अनेक ठिकाणी भरत असून ठाणे जिल्ह्यातील म्हसे (ता. मुरबाड) गावी पौष पौर्णिमेला भरणारी यात्रा ही त्याची एक प्रमुख यात्रा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.