Pune: गॅंग ऑफ ट्रेकर्सने केले ५ दिवसात ११ गड-किल्ले-शिखर सर
पुणे: सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या हेतूने गॅंग ऑफ ट्रेकर्स, पुणे यांच्या ट्रेकर्सने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील चढाई करण्यास अतिशय अवघड व कठीण असलेले एकूण ११ गड-किल्ले-शिखर अवघ्या ५ दिवसात सर करण्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या मोहिमेमध्ये ट्रेकर्सने पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर तर दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील वणी जवळील अहिवंत किल्ला, मोहनदर किल्ला व सप्तशृंगी गड, तिसऱ्या दिवशी बागलाण प्रांतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर असलेला साल्हेर किल्ला व बलाढ्य व चढाईस कठीण असलेला सालोटा किल्ला, चौथ्या दिवशी सटाणा तालुक्यातील मुल्हेर किल्ला, हरगड व मोरागड आणि पाचव्या दिवशी भिलवड येथील मांगी शिखर व तुंगी शिखर असे सलग एकूण ११ गड-किल्ले-शिखर अवघ्या ५ दिवसात सर केले.
या मोहिमेमध्ये १३ ते १८ वर्ष वयोगटातील किर्ती बिजगर्णी, मृदुला परळकर तसेच विश्राम कुलकर्णी आणि अॅड. सम्राट रावते यांनी सहभाग घेऊन शारिरीक तंदुरुस्तीचा संदेश देत ही कठीण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. अश्या प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यातील अवघड व कठीण गड-किल्ले सलग सर करण्याचे गॅंग ऑफ ट्रेकर्सचे हे ५ वे वर्ष असून भविष्यात मोठ्या हिमालयातील मोहीमा पार पडण्याचा मानस आहे.