संग्रहित छायाचित्र
पुणे: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर बुधवारी (दि. ४) सडकून टीका केली. आरक्षणाच्या मुद्यावर आमच्या अंगावर मराठा घालता, ओबीसी घालता. पण आता या प्रकरणी फेक नरेटिव्ह चालणार नाही. ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला,’ असे म्हणत त्या विरोधकांवर तुटून पडल्या.
महाविकास आघाडीला उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘तुम्ही आमच्या पक्षावर टीका करता. पण तुमची भूमिका काय? तुम्ही आमच्या विरोधात ओबीसी समाज समोर करता, मराठा समाजाला, दलित समाजाला समोर करता. आम्ही दुसऱ्या देशातून आलोत का? येथील राजकारण उद्ध्वस्त करत आहोत का? आता राष्ट्रवादीलाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही हा प्रश्न विचारला पाहिजे.’’
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला जबर फटका बसला. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही, याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे. भाजप नेत्या पंकजा यांनी या प्रकरणी सातत्याने महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘‘भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण त्यानंतरही या समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला नाकारले. कारण, विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत हे नरेटिव्ह मोडून काढण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीलाच यासंबंधी त्यांची भूमिका विचारली पाहिजे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, अशी भूमिका या प्रकरणी घेतली पाहिजे.’’
पंकजांनी या वेळी राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या नाराज नेते व कार्यकर्त्यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘‘राजकारणात वेळोवेळी वेगवेगळे नवे अनुभव येत असतात. शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपण ज्यांना आयुष्यभर विरोध मानत होतो ती राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. त्यानंतर त्यातील एक गट आपल्याबरोबर सत्तेत आला. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तह करावे लागतात. काही आडाखे बांधावे लागतात. त्यानुसार त्यांना सोबत घेताना वरिष्ठांनी बांधली असेल. त्यामुळे या प्रकरणी कुणीही नाराज होता कामा नये,’’ असे त्या म्हणाल्या.