मोशीच्या खाणीत गाडला कचरा; हे पाप कोणाचे?

मोशी येथील गौण खाणीसह आजूबाजूच्या परिसरात लाखो टन कचरा जमिनीत गाडला आहे. हा कचरा जमिनीत गाडून त्यावर माती-मुरुम टाकण्यात आली आहे. हा कचरा साठल्यामुळे निर्माण होणारे विष हे जमिनीत मुरणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 10 Nov 2024
  • 12:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मोशी, चऱ्होली, डुडुळगाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात, भविष्यात प्रत्येक घरी आढळणार गंभीर आजाराचे रुग्ण

मोशी येथील गौण खाणीसह आजूबाजूच्या परिसरात लाखो टन कचरा जमिनीत गाडला आहे. हा कचरा जमिनीत गाडून त्यावर माती-मुरुम टाकण्यात आली आहे.  हा कचरा साठल्यामुळे निर्माण होणारे विष हे जमिनीत मुरणार आहे. त्यामुळे भविष्यात मोशी, चऱ्होली, डुडूळगाव यासह अन्य परिसरातील बोअर, विहिरीच्या पाण्यात विष उतरुन गंभीर आजाराचे रुग्ण निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक भागात सोसायटीचे स्वतंत्र बोअर आहेत. काही सोसायट्यांना टॅंकरद्वारे विहिरीचे पाणी वापरतात. त्यामुळे गौण खाणीसह परिसरात जमिनीत गाडलेल्या कचऱ्याचे पाप कुणाचे आहे, असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे- नाशिक महामार्गावरील शहराचे प्रवेशद्वार अशी मोशी उपनगरांची ओळख आहे. हे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा सगळा कचरा मोशीतील कचरा डेपोवर आणून टाकला जातो. गेल्या ३० वर्षांत डेपोत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. मोशी परिसरात अनेक नव्या  सोसायटी निर्माण होत आहेत. 

मोशी प्राधिकरण, वाघजाई पार्क, आदर्श नगर, गंधर्व नगरी, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, डुडूळगाव यासह अनेक भागात बाहेरील नागरिक वास्तव्यास येत आहेत. मोशी कचरा डेपोतून निघणारा धूर, विषारी वायू, धूलिकण यामुळे या भागात नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले यांना श्‍वसनाचे विकार वाढू लागले आहेत.

त्यामुळे कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काय करावे आणि काही नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दम्याचा आजार असणाऱ्या वयोवृद्धांना श्‍वास घेताना त्रास होत आहे. तर लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, यावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणूनही कचऱ्याचे डोंगर हटवले गेलेले नाहीत.

मोशीच्या वडमुखवाडी भागात गौण खाणीत लाखो टन कचरा जमिनीत गाडला गेला आहे. हा कचरा नेमका कुठला आहे, महापालिका हद्दीतील आहे की हद्दीबाहेरील कचरा शहरात आणला आहे. कुणी आणून इथे कचरा टाकला आहे. हा कचरा गौण खाणीत टाकून तो कशासाठी गाडला आहे?, त्यावर माती- मुरुम कुणी टाकली आहे असे एक नव्हे शेकडो प्रश्न नागरिकांना पडले आहेत. मोशी परिसरातील गौण खाणीत टाकलेला कचरा घातक आहे. महापालिकेच्या प्रस्तावित किक्रेट स्टेडियम जागेसह ९० मीटर रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यातही तो टाकला आहे. त्यावर माती व मुरुम टाकून तो कचरा जमिनीत गाडला आहे.

भविष्यात या कचऱ्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होवून गंभीर आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. जमिनीत कचरा गाडल्याने पाऊस पडून त्या कचऱ्याचे रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरुन आजूबाजुच्या परिसरातील विहिर, बोअरच्या पाण्यात मिसळल्यास पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. अनेक पिकांना ते पाणी दिल्यास शेतीमाल खाण्यायोग्य राहणार नाही. अनेक सोसायटीत बोअरचे पाणी वापरतात. त्यांनाही ते प्रदूषित पाणी प्यावे लागणार आहे. विहीरीच्या पाण्यात हे विष मिसळल्यास ते पाणी दूषित होणार आहे.

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मोशीच्या वडमुखवाडी परिसरातील गौण खाणीसह स्टेडियम जागेसह ९० मीटर रस्त्यालगत असलेल्या खडड्यात गाडलेल्या कचऱ्याने नागरिकांचे भविष्य अंधारमय होणार आहे  यामुळे मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी, वडमुखवाडी यासह तापकीरनगर, खानदेश नगर, आदर्श नगर, गंधर्व नगरी, वाघजाई पार्क, बोराटे वस्ती, मोशी प्राधिकरणातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे.  त्यामुळे कचऱ्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी संपुर्ण कचराच जमिनीत गाडला गेला आहे. यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.  प्रकरणाची योग्य ती दखल घेवून तात्काळ चौकशी करावी, या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

मोशीकरांच्या जीवाशी खेळ

शहरातून दररोज एक हजार ते बाराशे टन कचरा गोळा होत आहे. मागील २० वर्षांपासून हा प्रश्न स्थानिक आमदाराला सोडवता आला नाही. केवळ कचऱ्याच्या डोंगरावर कोट्यवधींचा खर्च करुन औषध फवारणी केली जाते. तरीही कचऱ्याची दुर्गंधी हटण्याचे नाव घेत नाही. कचऱ्याचे डोंगर वाढतच आहेत.  हा प्रश्न जटील असताना आता गौण खाणीतही प्लास्टिक, कुजलेला कचरा टाकलेला आहे. अनेक ठिकाणी हा कचरा जमिनीत गाडला आहे. या कचऱ्यामुळे भविष्यात मोशीकरांसह आजू-बाजूच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळाची डोळेझाक

मोशी परिसरातील गौण खनिज, रस्त्यालगत आणि महापालिकेच्या आरक्षित असलेल्या अनेक भागात लाखो टन कचरा जमिनीत गाडला आहे. याकडे महापालिका, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरित लवादाने देखील दुर्लक्ष केले आहे. गौण खाणीत पाणी असताना त्यात कचरा टाकलेला आहे. रस्त्याच्या लगत असलेल्या खड्ड्यात कचरा टाकलेला आहे. महापालिकेच्या अनेक प्रस्तावित आरक्षणावर देखील कचरा टाकलेला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक भागात कचरा टाकून त्या माती-मुरुम टाकून जमिनीत गाडला आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्याशी खेळले जात आहे.

मोशी परिसरात कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर महापालिकेने कमी केल्याचा दावा केला आहे. पण, गौण खाणीसह प्रस्तावित स्टेडियम, ९० मीटर रस्त्यालगतच्या परिसरात जमिनीत न जिरणारा कचरा (आरडीएफ), घातक कचरा कोणतीही प्रक्रिया न करता खडड्यात टाकला आहे. त्यावर माती व मुरुम टाकून तो कचरा जमिनीत गाडला आहे. त्यामुळे खाणीत जैवविविधता नष्ट होत आहे. भविष्यात जमिनीतील विष पाजरुन अनेक बोअर, विहीरीतून ते नागरिकांना पाणी पिल्यास त्यांच्या जीवाशी आणि आरोग्याशी कोण खेळ करत आहे.

- प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story