दुर्गादेवी टेकडीवर 'वॉकेथॉन फॉर मतदान'

पहाटेच्या गुलाबी थंडीत हळूच पूर्वेकडून येणारी आशेची कोवळी किरणे.. सकाळी टेकडीवर फेरफटका मारायला आलेले आबालवृद्ध. अचानक टेकडीच्या रस्त्यावर वाढलेली गर्दी.. हातात संदेश फलक घेऊन पुढे येणारी वर्दळ.. वर्दळीत सेल्फी घेण्यासाठी घाई करणारी तरुणाई

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 9 Nov 2024
  • 06:40 pm

अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

पहाटेच्या गुलाबी थंडीत हळूच पूर्वेकडून येणारी आशेची कोवळी किरणे.. सकाळी टेकडीवर फेरफटका मारायला आलेले आबालवृद्ध. अचानक टेकडीच्या रस्त्यावर वाढलेली गर्दी.. हातात संदेश फलक घेऊन पुढे येणारी वर्दळ.. वर्दळीत सेल्फी घेण्यासाठी घाई करणारी तरुणाई .. कवायती सोडून गर्दीच्या दिशेने कुतूहलाने पाहणारे नागरिक .. गर्दी जवळ येताच सुखद धक्क्याने चकित होऊन गर्दीत सहभागी होणारे महिला-पुरुष..  असे दुर्मिळ चित्र निर्माण झाले, ते दुर्गादेवी टेकडी येथे महापालिकेने आयोजित केलेल्या “वॉकेथॉन फॉर मतदान” या उपक्रमात सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या सहभागामुळे..!

मतदार जनजागृती व स्वीप प्रक्षेपण (लॉंचिंग) पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीने निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान (दुर्गादेवी टेकडी) येथे  “वॉकेथॉन फॉर मतदान” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रेया बुगडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कनिष्ट अभियंता सारिका नागरगोजे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक -युवती, नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 यावेळी आबालवृद्धांसह  नागरिकांनी एकच गर्दी केली. दुर्गादेवी टेकडीच्या परिसरात मतदार जनजागृतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते. दुर्गादेवी टेकडी  येथे महापालिकेच्या वतीने आयोजित “वॉकेथॉन फॉर मतदान” या उपक्रमात सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांनी टेकडीवर फिरायला आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक - यवती, माजी सैनिक, नवमतदार, नागरिक यांच्याशी संवाद साधला.

यावेळी श्रेया बुगडे म्हणाल्या,  “मानवी सुदृढ आरोग्यासाठी जसे व्यायाम, योगासने, शारीरिक कवायती महत्वाच्या आहेत तसेच लोकशाहीच्या आरोग्यासाठी मतदान करणे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यासाठी नागरिकांनी निवडणुकीमध्ये आपल्या मताचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.

मताधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला महत्वपूर्ण हक्क आहे. निवडणुकीत मतदान करण्याची संधी प्रत्येक मतदाराला ५ वर्षाने मिळते. ज्याचा वापर करून आपण आपल्या कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने  देशाचे भविष्य उज्वल करू शकतो. मतदारांनी मतदान करण्याची ही अनोखी संधी न गमावता येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मताधिकार बजावावा, असे आवाहन श्रेया बुगडे यांनी केले.

यावेळी मतदार जनजागृतीसाठी महापालिकेने आमंत्रित केल्यामुळे विविध नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, असे सांगत श्रेया बुगडे यांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले. यावेळी श्रेया बुगडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टेकडीवर रंगल्या.. मतदानाच्या गप्पा

टेकडीवर फिरायला आलेल्या माजी सैनिकाला श्रेया बुगडे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले, यावेळी भावूक झालेल्या माजी सैनिकाने “आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर हातात शस्त्र घेऊन लढत असतो तसेच मतदारांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या मताच्या अधिकाराचा पूर्ण वापर करावा आणि मतदान नक्की करावे.” मी देखील मतदान नक्की करणार असल्याचे ते म्हणाले. 

शहरात महापलिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तळागळा पर्यंत जनजगृती करण्यामध्ये शहरतील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली असून महापालिकेची स्वीप टीम, समाज विकास विभागाद्वारे मतदार जनजागृती सर्वत्र करण्यात येत आहे. नागरिकांनी येत्या निवडणुकीत  मोठ्या संख्येन मतदान करावे,  असे आवाहन करण्यात येत आहे.

- विजयकुमार खोराटे (अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका)

 

पथनाट्य, नृत्यकलेद्वारे मतदान जनजागृती

दुर्गादेवी टेकडी येथे झालेल्या “वॉकेथॉन फॉर मतदान” उपक्रमात मतदार जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांनी लोकशाही तसेच देशभक्तीपर गीताच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. आकर्षक नृत्य सादर करण्याऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, चित्तथरारक कसरती आणि त्यांची नृत्यकला पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.  यावेळी कलाकार गणेश लोंढे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून नागरिकांचे मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच यावेळी मतदार जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत शपथ घेतली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story