संग्रहित छायाचित्र
आयडीटीआरमध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठी लागणारा वेळ आणि अर्जदारांचा त्रास कमी करण्याच्या हेतूने दुचाकीसाठी एक नवीन ट्रॅक वाढवण्यात येणार आहे. ज्यामुळे तपासणी जलद होऊन नागरिकांना ताटकळत थांबावे लागणार नाही. पिंपरी-चिंचवड आरटीओ अधिकाऱ्यांनी या ठिकाणांच्या पाहणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मूलभूत सुविधाही अर्जदारांना पुरवण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाराने सांगितले.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून तो प्रादेशिक परिवहन करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधांसाठी आरटीओ प्रयत्न करत आहे. लर्निंग (शिकाऊ) परवाना काढल्यानंतर ठराविक वेळेनंतर पर्मनंट (कायम) परवाना काढावा लागतो. त्यासाठी कासारवाडी येथील आयडीटीआर या केंद्र शासनाच्या विभागामध्ये चाचणी घेण्यात येते. दुचाकी आणि चार चाकी वाहनांची या ठिकाणी विविध टप्प्यामध्ये चाचणी झाल्यानंतर अर्जदारांना वाहन परवाना दिला जातो. त्या ठिकाणी आरटीओचे अधिकारी उपस्थित असतात.
पिंपरी-चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भाग आणि आंबेगाव, जुन्नर या ठिकाणचे देखील अर्जदार चाचणीसाठी कासारवाडी मध्ये येतात. मात्र या ठिकाणी आल्यानंतर चाचणीसाठी वेळ लागतो. एखाद्या अर्जदाराची दुचाकी आणि चारचाकी हे दोन्ही परवाना असेल, तर त्याचा जवळपास अख्खा दिवस त्या ठिकाणी मोडतो. परिणामी, हा वेळ वाचावा अशी मागणी अर्जदारांकडून होत होती. ड्रायव्हिंग टेस्टसाठी तब्बल दोन ते अडीच तास जादा लागतात. परिणामी, एकाच दिवशी कमी जणांची तपासणी करण्याची वेळ येते. त्याचप्रमाणे मोटर ड्रायव्हिंग स्कूलकडून आयडीटीआर ज्यादा रक्कम आकारात आहे, अशाही काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शंभर रुपये घेऊन मूलभूत सुविधा पुरवत नसल्याचे अर्जदारांचे आरोपही होते.
दरम्यान, यानंतर आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडसाठी देण्यात येणारा दुचाकी ट्रॅक आणखी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चारचाकी वाहन परवाना बाबत वेळ कमी करण्याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना सकाळी लवकर चाचणी सुरू करण्याबाबत सूचनाही केले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या अर्जदारांना पाणी आणि सावलीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ट्रॅकसाठी करावा लागणार वेळ खर्च?
सध्या उपलब्ध असलेल्या ट्रॅकवर पिंपरी-चिंचवड आरटीओ अंतर्गत अर्जदारांची चाचणी पार पडते. मात्र, ती अपुरी असल्याने या ठिकाणी नवीन ट्रॅक उभारावा, अशी मागणी मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी केली होती. मात्र, यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार आहे. तसेच, येत्या वर्षभरात आरटीओचा स्वतःचा स्वतंत्र ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आत्ता आहे त्या स्थितीमध्ये तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आयडीटीआर या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. दुचाकी साठी आणखी एक वेगळा ट्रॅक तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे येथे चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्णबाबत देखील चर्चा झाली आहे. तसेच इतरही तक्रारीचे निरसन करण्यात येईल. - संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड