संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यात चार कारवायांमध्ये पोलिसांनी १४ लाख ३७ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या विशेष नाकाबंदी दरम्यान शुक्रवारी (दि. ८) पहाटे अडीचच्या सुमारास एक संशयित चारचाकी वाहन कृष्णानगर चौक येथे अडवण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता वाहनात असणारे सुमित नितीन धुमाळ (२३, रा. साने चौक, चिखली), अविनाश माधव कांबळे (२३, रा. आळंदी) यांच्याकडे एक लाख ५१ हजार ५०० रुपयांची रोकड मिळाली. याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तरे न दिल्याने रोकड जप्त केली.
दुसऱ्या कारवाईत सोमाटणे टोलनाका येथे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाकडून गुरुवारी (दि. ७) वाहन तपासणी सुरू होती. त्यावेळी एका संशयित वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये असणारे विजय मारुती मांडुळे (२९, रा. थोरम, करंजगाव, ता. मावळ) व संकेत वाडेकर (२३, रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्याकडे दोन लाखांची रोकड मिळाली. याबाबत कागदपत्रे सादर न केल्याने रोकड जप्त केली. तसेच पुढील कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
तिसऱ्या कारवाईत थरमॅक्स चौकात निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गस्तीवर असताना दोन व्यक्तींजवळ १० लाच एक हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. ही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली.
चौथ्या कारवाईत तळेगाव दाभाडे पोलिसांकडून गुरुवारी (दि. ७) सोमाटणे टोल नाका येथे वाहन तपासणी सुरू होती. त्यावेळी एका चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनातील अक्षय रामदास आटोळे (१९, रा. सांगवी) याच्या ताब्यात ८५ हजार २३० रुपये मिळून आले. ती रोकड तळेगाव दाभाडे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन निवडणूक कक्षाकडील भरारी पथकाच्या ताब्यात दिली.