संग्रहित छायाचित्र
क्युनेट बिझनेसच्या नावाखाली पतीसह चार जणांनी विवाहितेची ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच, फसवणूक झालेले पैसे तू माहेराहून आणले नाही तर तू हे पैसे जुगारात हरली, असे सर्वांना सांगेल, अशी धमकी दिल्याने पत्नीने आत्महत्या केली. ही घटना रावेत येथे घडली.
प्रकाश गजानन देशमुख (वय ३२, रा. सिंधी मेघे आकरे लेआऊट, जि. वर्धा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जळगाव येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील नर्स टिचर, राहणार जळगाव, विवेक अवचार (राहणार स्टाफ नर्स, ई.एस.आय.सी.हॉस्पीटल, कांदिवली), थेरगाव हायलाइफ सोसायटीत राहणारी महिला आरोपी, अनुप वासनिक (रा. क्रिस्टाईन ट्रोलाईफ, शंकर कलाटनगर) आणि मयत विवाहितेचा पती गुंजल सदाशिव घागरे (रा. नवनीतनगर, नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
कविता देशमुख-घागरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना १ डिसेंबर २०१९ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रावेत येथील अर्बन स्कायलाइन येथे घडली. फिर्यादीची बहिण कविता ही आरोग्यसेविका म्हणून काम करीत होती. तिची क्युनेट बिझनेसच्या माध्यमातून आरोपींशी ओळख झाली. या सर्वानी मिळून तिच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये घेतले.
मात्र, हे पैसे परत न देता तिची फसवणूक केली. तसेच, कवितेचा पती गुंजल याने तिला पैसे बुडाले कसे, सगळे पैसे तुझ्या आईकडून आण, नाहीतर मी तुला घरात ठेवणार नाही, असे सतत बोलून तिला मानसिक त्रास दिला. बुडालेले पैसे तुझ्या आईकडून आणले नाहीतर, तु जुगारामध्ये पैसे हरली, अशी तुझी सगळीकडे बदनामी करेल, असे बोलून मारहाण करून व मानसिक त्रास दिला. यातून नैराश्य आल्याने कविताने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
शिवीगाळ करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दिघीतील साई पार्क येथील एचपी पेट्रोल पंपाजवळील रस्त्यालगत घडली. दिघी पोलिसांनी तीघांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजकुमार महादेव बांगर (वय ४८, रा. साई सिद्धी कॉलनी, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुनसिंग बाधा (वय २५), आकाश उर्फ आक्या साळवे (वय २२, दोघे रा. दिघी), मिर्झा सोएल (वय २३, रा. विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे फिर्यादीकडे पाहून शिवीगाळ, दमदाटी व दंगा करीत होते. फिर्यादी हे त्यांना तुम्ही शिवीगाळ करू नका, असे समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने आरोपींनी रॉड, हॉकी स्टिक व दगडाने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. यावेळी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली.