संग्रहित छायाचित्र
ताथवडे, पुनावळे परिसरात राहणा-या अनेक सोसायटीतील नागरिकांनी एकत्रित येत महापालिकेच्या रस्त्यालगत फूटपाथवर दुतर्फा देशी वृक्षाची लागवड करत आहे. या नागरिकांनी झाडांची भिशी नावाचा ग्रुप तयार करत वृक्ष लागवड करुन त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून संरक्षण जाळ्या देखील अनेक ठिकाणी लावल्या आहेत. त्या झाडांचे संगोपन करत त्यांना पाणी देखील घातले जात आहे. मात्र, काही अज्ञाताकडून झाडांच्या भोवती लावलेल्या संरक्षण जाळ्या काढून झाडांची नासधूस करण्यात येत आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका हद्दीतील ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरात मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या भागात नागरीकरण होताना पुर्वीचे झाडांची कत्तल देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहण्यासह संरक्षण आणि संवर्धन व्हावे, याकरिता ताथवडे, पुनावळे भागातील नागरिकांनी एकत्रित येत झाडांची भिशी नावाचा सोशल माध्यमाचा ग्रुप बनविला आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून ताथवडे, पुनावळे भागात देशी प्रकारची झाडे महापालिकेच्या रस्त्यावरील फुटपाथवर लावली जात आहेत.
त्या झाडांचे संगोपन व्हावे, नवीन झाडे लावण्याच्या वेळी त्यांचे मानवासह जनावरांपासून संरक्षण व्हावे, त्यांची वाढ नीट व्हावी, यासाठी झाडांभोवती संरक्षण जाळ्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. त्या झाडांना पाणी देवून त्यांची चांगली वाढ होत आहे.
महापालिका रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनासाठी झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. तरीही काही झाडांच्या जाळ्या काढून त्या झाडांची नासधूस केली जात आहे. तर काही झाडे मोकाट जनावरांच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांपैकी काही झाडे सुस्थितीत आहेत. इतर झाडे संरक्षण जाळीअभावी वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, नवीन रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोड करण्यात येते. विकास कामांसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. तोड केलेल्या वृक्षांच्या जागी रस्त्याच्या कडेला झाडांचे रोपटे लावले जाते. त्या झाडांची पूर्ण वाढ होईपर्यंत महापालिकेने त्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.