'त्यांचे' सर्व भवितव्य मोदींच्या हातात - शरद पवार

मुंबई - केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी अस्वस्थ होते. त्यांची खंत ते माझ्यासमोर मांडत होते. हल्ली भाजपाला वॉशिंग मशीन म्हटलं जातं, तेथे टाकलं की धुवून बाहेर टाकलं जातं.

संग्रहित छायाचित्र

भाजपबरोबर गेलेल्या नेत्यांबाबत शरद पवार यांनी मांडली स्पष्ट भूमिका

मुंबई - केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी अस्वस्थ होते. त्यांची खंत ते माझ्यासमोर मांडत होते. हल्ली भाजपाला वॉशिंग मशीन म्हटलं जातं, तेथे टाकलं की धुवून बाहेर टाकलं जातं. त्यामुळं तिथे गेल्यानंतर आपल्याला संधी मिळेल, असं अनेकांचे मत होतं. अनेक वर्ष संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय मला कळवला, तेव्हा मी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. कारण माझ्या अंदाजानुसार, मोदींचे विचार मान्य करतो म्हटल्यावर आज त्यांची फाईल टेबलावरून कपाटात गेली. उद्या त्यांना वाटेल तेव्हा कधीही फाईल बाहेर काढली जाईल. आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं, हे कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काही नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)  पक्षाचे नेते शरद पवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवरही स्पष्ट भूमिका मांडली भाजपबरोबर गेलेले नेते मोदींच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत परत येणार नाहीत. त्यांचे सर्व भवितव्य मोदींच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. 

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वितुष्ट निर्माण झालं. त्यानंतर महाविकास आघाडी आकार घेत असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अडीच दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरही शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपद दिले. यामागे त्यांचा कोणता विचार होता? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, त्यावेळी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता, दुरुस्ती करण्याची संधी द्या, असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली. त्यानंतर ते दोन वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते.

अजित पवार यांना जशी एक संधी दिली, तशी संधी इतर नेत्यांनाही देणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मला स्वतःला वाटत नाही की, ते परत येतील. जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत ते परत येणार नाहीत. कारण त्यांचे सर्व भवितव्य मोदींच्या हातात आहे. बारामती लोकसभेतून अजित पवार यांनी सूनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली असून या मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, अमित शाह यांनी अजित पवारांना बारामती मतदारसंघ जिंकून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दिल्लीमधील चर्चांमधून मला कळली. बारामतीमध्ये अजून मी प्रचाराला सुरुवात केलेली नाही. फक्त प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गेलो होतो. शेवटच्या टप्प्यात मी प्रचारासाठी जाईन.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest