थप्पड से डर नहीं लगता बाबुजी...

जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्याच्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या (एसडीएम) कानशिलात लगावणाच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 17 Nov 2024
  • 03:31 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राजस्थानमधील अधिकाऱ्याच्या कानशिलात मारल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ६० दुचाकी १८ चार चाकींची राखरांगोळी

जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्याच्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या (एसडीएम) कानशिलात लगावणाच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. नरेश मीणा याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. दरम्यान, मीणा यांच्या अटकेनंतर मतदारसंघातील सामरावता गावात उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे ६० दुचाकी आणि १८ चारचाकी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. मात्र अटक सत्रानंतर मीणा समर्थक आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी परस्परांविरुद्ध आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

देवळी-उनियारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान बुधवारी दुपारी नरेश मीणा यांनी मालपुराचे उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशिलात लगावली होती. थप्पड प्रकरणानंतर सुरू झालेला तणाव बुधवारी रात्रभर आणि गुरुवारपर्यंत कायम होता. मीणा यांच्या अटकेसाठी ‘आरएएस असोसिएश’न आणि संबंधित सेवा अधिकाऱ्यांनी संप पुकारला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याबरोबर बैठक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालयांतील कामकाजाला याचा मोठा फटका बसला.

मीणा यांच्या अटकेनंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली. गुरुवारी पहाटे झालेल्या हिंसाचारानंतर सुमारे ६० जणांना पोलिसांनी अटक केली. परंतु यानंतरही तणाव कायम होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अटकेनंतर समर्थक आक्रमक

नरेश मीणा यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने पूर्ण ताकदीनिशी बंदोबस्त तैनात करून ‘फ्लॅग मार्च’ काढला. टोंकचे पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी पोलीस पथकाला गावात प्रवेश करून मीणा यांना ताब्यात घेण्याचे अंतिम निर्देश दिले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मीणा यांच्या अटकेनंतर समर्थक संतप्त झाले. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 

मीना यांच्या कथित समर्थकांनी रस्त्यांवर जाळपोळ सुरू केली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. नरेश मीणा यांच्यावर सार्वजनिक कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासह चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (अजमेर) ओम प्रकाश यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest