पुण्यातील महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर
बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह आणि अपत्याचा जन्म यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे (स्तनाचा कर्करोग) प्रमाण (breast cancer) वाढते आहे. २०२० च्या ग्लोबोकन अहवालानुसार ( Globocan report), भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण १३.५ टक्के आहे. पुण्यामध्ये (Pune News) तर दर २१ महिलांमागे एकीला ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवत आहेत.
स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा स्तनाचा कर्करोग महिना म्हणून पाळला जातो. ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले की, "पुण्यातील २१ पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होतो. एका महिन्यात सरासरी ८-१० नवीन प्रकरणे माझ्याकडे येतात. भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, जागरुकता आणि स्वच्छतेच्या सवयीमुळे त्याचे प्रमाण कमी होत आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पहिल्या क्रमांकावर आहे. शहरीकरण आणि बदलती जीवनशैली याचे प्रमुख कारण हे आकडेवारीनुसार सिध्द करणे अवघड असले तरी मुख्य कारण हेच आहे. आहार, महिला बाळाला स्तनपान करतात की नाही या अनेक घटकामुळे हे प्रमाण वाढत आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या (आयसीएमआर) भारतातील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ग्रामीण भागात दरवर्षी प्रति १ लाख महिलांमागे ५ आहे. शहरी भागात हेच प्रमाण ३० आहे. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, जीवनशैलीतील बदलांमुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. जीवनात तणाव (स्ट्रेस) वाढल्याने लवकर वयात येतात. भावी आयुष्यात ब्रेस्ट कॅन्सरसाठी हे एक कारण आहे. याशिवाय करीअरसाठी वाढत्या वयापर्यंत शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने पहिल्या बाळंतपणाचे वयही वाढत आहे. मातामध्ये स्तनपानाचे प्रमाण कमी झाले आहे. या अनेक कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत आहे.
कर्करोग तज्ज्ञ डॉ. तुषार पाटील 'सीविक मिरर' शी बोलताना म्हणाले, आमच्याकडे दरवर्षी सरासरी १००-१५० नवीन रुग्ण आढळतात. लठ्ठपणा, फॅटचे सेवन, उशिरा विवाह आणि गर्भधारणा यासारख्या जीवनशैलीशी संबंधित समस्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर वाढत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पर्पेटुआ फर्नांडिस म्हणाले, संकोचामुळे महिला तपासणीसाठी उशीर करतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावरच उपचार होत नाहीत. यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.