बाप्पा विघ्नहर्ता... नको खड्डे अन् गर्ता; अनेक मंडळांची स्टीलच्या स्टँड, फायबर मंडपांना पसंती

यंदा अनेक मंडळांची स्टीलच्या स्टँड असलेल्या अॅल्यूमिनिअम किंवा लोखंडी फ्रेम असलेल्या आकर्षक आणि भक्कम फायबर मंडपांना पसंती, फोल्डेबल चाके असलेल्या रनिंग मंडप आणि कमानींनाही प्राधान्य

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Thu, 14 Sep 2023
  • 03:25 pm
Bappa Vighnaharta : बाप्पा विघ्नहर्ता... नको खड्डे अन् गर्ता; अनेक मंडळांची स्टीलच्या स्टँड, फायबर मंडपांना पसंती

बाप्पा विघ्नहर्ता... नको खड्डे अन् गर्ता; अनेक मंडळांची स्टीलच्या स्टँड, फायबर मंडपांना पसंती

यंदाचा गणेशोत्सव जेमतेम सात दिवसांवर आला आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे. मंडप, सजावट, आरास, मूर्ती, नैवेद्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. पण पुणेकरांना धास्ती आहे, ती उत्सवानंतरच्या जीणे मुश्किल करणाऱ्या खड्ड्यांची. विशेषत: मानाच्या आणि प्रसिद्ध गणपतींच्या आसपासच्या रस्त्यांवर पडणारे असंख्य खड्डे बुजवणे पालिकेसमोर तर आव्हानच असते. रस्त्यावरील खड्डे सिमेंट-काँक्रिटमध्ये बुजवून रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक असले तरी लाखोंची उलाढाल करणारी मंडळे ही बाब गांभीर्याने घेत नाहीत.

यंदा मात्र काही महत्त्वाच्या मंडळांनी हा पायंडा मोडण्याचे ठरवले आहे. यंदा काही मंडळांनी पारंपरिकसह फायबर मंडपाला पसंती दिली आहे. खड्डा न  खणता भक्कमपणासाठी स्टीलच्या स्टँडचा वापर होत आहे. आधुनिक सामग्री वापरुन  यंदा खड्डेविरहित मंडपाकडे मंडळांचा कल असल्याचे दिसून येत आहे. रनिंग मंडप (खाली चाके असलेले मंडप) आणि कमानींना प्राधान्य देत आहेत. या मांडवामुळे निश्चितच खर्चात वाढ होते. मात्र, अशा प्रकारचा मांडव आरामदायी असतो. या मांडवांचे माप, मोजणी, उभारणी उत्कृष्ट होते. खड्डेविरहित मांडवांची अधिक वजन पेलण्याची क्षमता असते.  हा मांडव गणेश मूर्ती, देखावे यांचे वजन सहज पेलू शकतो. या मांडवांमध्ये अचूकता असते.

पुण्यातील सदाशिव पेठेतील येथील हत्ती गणपती मंडळ आणि बाजीराव रस्त्यावरील नातूबाग ही दोन मोठी व प्रसिद्ध मंडळे गेल्या काही वर्षांपासून आवर्जून खड्डेविरहित मांडव उभारत आहेत. मानाचा पहिला गणपती -कसबा गणपती, अखिल मंडई मंडळ, सेवा मित्र मंडळ, नवकिरण तरुण मित्र मंडळ, ढोले पाटील रस्ता मंडळ  अशी अनेक मंडळे आघाडीवर आहेत.

हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष शाम मानकर मंडळाच्या निर्णयाबद्दल म्हणाले, की सर्वप्रथम पुणे शहरात हत्ती गणपती अशा प्रकारचे  मांडव घालण्यास सुरुवात केली. हा मांडव सुरक्षित आणि मजबूत असतो. अशा प्रकारच्या मांडवा मुळे, अशा प्रकारचा मांडवामुळे रस्त्यांवर खड्डे होतच नाही परंतु पर्यावरणा चे सुद्धा रक्षण केले जाते. यंदाही आम्ही हेच मॉडेल स्वीकारले आहे.

नातूबाग मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे म्हणाले, "नातूबाग मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी खूप होते. हा रस्ता रहदारीचा असल्याने मांडव घालण्याची परवानगी पाच दिवस आधी मिळते आणि उत्सवानंतर चार दिवसांत मांडव काढावा लागतो. म्हणजे उत्सवाचे दिवस विचारात घेता फक्त वीस दिवसांसाठी परवानगी मिळते. अशा अनेक अडचणी असल्याने खड्डेविरहित मांडव घालण्याचा निर्णय आमच्या मंडळाने घेतला.गेल्या काही वर्षांपासून आमचे मंडळ खड्डेविरहित मांडव घालीत आहे.  मंडळाने खड्डेविरहित मांडवाचे स्ट्रक्चर तयार केले आहे. एकही खड्डा न घेता मांडव घालण्याची तंत्र  वापरले जात आहे. स्ट्रक्चर कायमस्वरूपी असल्याने कामगारांची मजुरी आम्ही देतो."

"शहरात मंडळांची संख्या तीन हजारांपेक्षा अधिक आहे. गणेशोत्सवापूर्वी एक महिना अगोदरच मंडप उभा करण्याचे काम सुरू झाले आहे.  देखावा व सजावटीसाठी मंडप गरजेचा असतो. उंची, रुंदी, स्टेजवरील वजनाचा विचार करून मंडपाची बांधणी केली जात आहे.  रस्त्यावर मंडप उभा करण्यासाठी मंडळांनी यंदा  विशेष मेहनत घेतली आहे.  पादचारी, वाहनचालकांना कमीत कमी अडथळा होईल, अशी रचना केली जात आहे.  महापालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करून हे काम करण्याचा मंडळांचा प्रयत्न आहे., असेही ते म्हणाले.

पुण्यातील प्रसिद्ध मांडवाले दाते मांडवाल्याचे दीपक दाते सीविक  मिररशी बोलताना म्हणाले, "नवीन तंत्रज्ञान वापर करून खड्डे न खणता मांडव उभारण्याचे काम सुरू आहे. लोखंडी , अॅल्युमिनियम आणि  स्टीलचे हे स्ट्रक्चर मजबूत आणि टिकाऊ असते, अशा मांडवांमुळे रस्त्यांवर खड्डे पडत नाही, आणि हे स्ट्रक्चर फोल्डेबल  असल्यामुळे हे ठेवणे सुद्धा सोपे जाते.

मांडव व्यावसायिक अमित काळे म्हणाले, "अशा प्रकारे मांडव घालून एक तर लोकांना ज्या खड्ड्यांमुळे होणारे त्रास यातून सुटका मिळते आणि पर्यावरणसुद्धा राखले जाते. कल वाढत असून येत्या काही वर्षात पुणे शहरातील सर्व मांडवखड्डेविरहित दिसतील."

शिरीष मोहिते, अध्यक्ष, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट म्हणाले, "पुण्यातील गणेश उत्सव हा नेहमीच  राज्यालाच नव्हे तर देशाला आदर्श घालून देत असतो.  आम्ही दरवर्षी कमीत कमी खड्डे कसे पडतील  याकडे लक्ष देतो आणि दरवर्षी  विसर्जन मिरवणूक निघते त्याच वेळेस खड्डेही  बुजवतो. मांडव घालताना आणलेले नवीन तंत्रज्ञान मंडळांनी आता स्वीकारले आहे."

नागरिकांना मंडपाचा अडथळा होणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घेतली आहे. अनेक मंडळांचे पूजन होऊन काम सुरू झाले आहे. नागरिकांना कार्यकर्ते सहकार्य करत असून ही सकारात्मक बाब आहे. विसर्जनानंतर तीन दिवसांच्या आत मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप काढून रस्ता मोकळा करण्यात येईल. रस्त्यावरील खड्डे सिमेंट-काँक्रिटमध्ये बुजवून रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक असल्याने खड्डे न खणताच मंडप उभारण्याच्या नव्या पद्धती आम्ही अवलंबल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या चे अभ्यासक आनंद सराफ म्हणाले, " पूर्वापार खड्डे खणून, बांबू किंवा  वासे वापरुन उभारलेले मंडप आता कालबाह्य हॉट आहेत. खड्डे विरहित, लोखंडी  आंणि कमानी पद्धतीने मंडप उभारण्याला आता प्राधान्य दिले जात आहे. मंडपाखालून वाहतूक होऊ शकणारे मंडपही उभारले जात आहेत.मंडपाचा खर्च जरी वाढला तरी तो भार प्रायोजक मंडळी पेलत असल्याने उत्सव विघ्नरहित हॉट आहे, याचा आनंद आहे."

महापालिकेचे नियम:

-उत्सव मंडप, स्वागतकमानी आणि रनिंग मंडपासाठी २०१९ मध्ये दिलेली परवानगी ग्राह्य धरणार

-यंदा प्रथमच उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवाना काढावा लागणार आहे; मात्र महापालिका विनाशुल्क परवाना देणार

-४० फुटांपेक्षा अधिक उंचीचा मंडप करायचा असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंत्याकडून स्थिरता प्रमाणपत्र घ्यावे लागणार

-मंडप आणि स्वागतकमानी करताना अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका तसेच रहदारीसाठी रस्ता मोकळा ठेवावा लागणार

-कमानीची उंची रस्त्यापासून १८ फुटांपेक्षा अधिक असावी.

आधीच्या खड्ड्यांचे काय?

शहरामध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्त्यांवर मात्र मोठे खड्डे असलेले दिसून येत आहे. महापालिकेकडून साडेसात हजार खड्डे बुजवल्याचा दावा करण्यात आला आहे. आगामी उत्सवामुळे महापालिका प्रशासनाची  खड्डे बुजवण्याची लगबग सध्या सुरु आहे. असे असले तरी अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे असून गणेशोत्सवामध्ये याचा अडथळा निर्माण होणार आहे.

पुणे पालिकेचे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे म्हणाले, “महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत ७  हजार ७३९ खड्डे बुजविले आहेत. ३५५  चेंबर्सची दुरुस्ती महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. खड्डे बुजविण्यासाठी २७  हजार मेट्रिक टन डांबरयुक्त खडी वापरण्यात आली आहे. उत्सवानंतर खड्डे तातडीने बुजवणे मंडळांना बंधनकारक आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest