वारांगना ते वीरांगना

बुधवार पेठेतील वेश्यांची वस्ती असलेला भाग हे समाजव्यवस्थेचे एक कटु सत्य आहे. संस्कृतीच्या वेशीवर आणि सभ्यतेच्या निकषांपासून लांब असलेल्या या भागातील महिलाच आता समाजासाठी पुढे आल्या आहेत. या भागातील कचरा वेचून स्वच्छता ठेवण्यासाठी काही महिलांनी वेश्याव्यवसाय सोडून स्वच्छतादूत म्हणून काम सुरू केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:29 am
वारांगना ते वीरांगना

वारांगना ते वीरांगना

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवार पेठेतील कचरा उचलण्यासाठी नकार दिल्याने १८ महिला झाल्या स्वच्छतादूत; १० जणींनी केला वेश्याव्यवसायाचा त्याग, कंपनीने घेतले 'पे-रोल'वर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

बुधवार पेठेतील वेश्यांची वस्ती असलेला भाग हे समाजव्यवस्थेचे एक कटु सत्य आहे. संस्कृतीच्या वेशीवर आणि सभ्यतेच्या निकषांपासून लांब असलेल्या या भागातील महिलाच आता समाजासाठी पुढे आल्या आहेत. या भागातील कचरा वेचून स्वच्छता ठेवण्यासाठी काही महिलांनी वेश्याव्यवसाय सोडून स्वच्छतादूत म्हणून काम सुरू केले आहे. एका कंपनीने अशा १८ महिलांना कामगार म्हणून कंपनीच्या 'पे-रोल'वर घेतले आहे. आज या महिला दरमहा एकवीस हजार रुपये कमावत आहेत.

शुक्रवारपेठेचा काही भाग आणि बुधवार पेठेत वेश्यावस्ती विखुरली आहे. अत्यंत कोंदट वातावरण, इमारतीतील दहा बाय दहाच्या खोल्या, ओठ रंगवून रस्त्यावर थांबलेल्या महिलांचे घोळके असे इथले वातावरण, सभ्येतेला धरून नसते. मात्र, समाजाचे ते एक वास्तव आहे, हेही खरेच. ही पेठ रात्री उजळते. इथे येणारा वर्गही वेगवेगळा असतो. नशेबाज, गुन्हेगारांचा वावरही या परिसरात आढळतो. वेश्यावस्ती असल्याने नाना तऱ्हेचे आणि ढंगाचे लोक येथे येतात. गुटखा, दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, कंडोम, सॅनटरी नॅपकीन, हगीज आणि लघवी केलेले कचऱ्याचे डबे असे इथले कचऱ्याचे ढोबळ स्वरूप असते. बराचसा कारभार रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने इथला दिवस उशिरा सुरू होतो. त्यामुळे बहुतांश कचरा रस्त्यावरच पडलेला असतो. तेथील कोंदटपणात कचऱ्याच्या दुर्गंधीची भर पडलेली असते.

वस्तीतील वेश्यालयांचा दिवस उशिरा सुरू होत असल्याने येथील कचरा उचलण्याच्या वेळाही वेगळ्या. 

आडवेळ आणि वस्तीतील कुबट वातावरण यामुळे महापालिकेच्या कचरावेचकांची गैरसोय होत होती. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका आणि सहेली संस्था एकत्र आली. त्यांना 'एएसआर'  या कन्स्ट्रक्शन कंपनीने कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अर्थात सीएसआरद्वारे मदतीचा हात दिला. त्यातून वेश्याव्यावसायिकांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. मोठ्या कंपनीतील कामगारांप्रमाणेच त्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कापला जात असून, दरमहा चांगले वेतन हातात पडत आहे. आज येथील १८ महिला स्वच्छतादूत म्हणून काम करीत आहेत. त्यातील दहा जणींनी वेश्याव्यवसाय सोडून दिला आहे.      

वेश्याव्यवसाय सोडून वस्तीला स्वच्छ ठेवण्यासाठी सुरुवातीला चार महिला समोर आल्या. त्यात स्वच्छतादूत म्हणून आघाडीवर काम करणाऱ्या छाया म्हणाल्या, 'बुधवार पेठेतील वस्तीत मी १५ वर्षे काम केले. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा मेडिकल दुकानात काम करतो. मुलीचे लग्न झाले असून, तिला दोन मुले आहेत. ती अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करते. मुले चांगल्या मार्गाला लागली. त्यामुळे मला हा व्यवसाय नको, असे मनापासून वाटत होते. त्यानंतर मी हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला. मी काम करत असताना सहेलीचे स्वयंसेवक वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काम करत होते. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सहेलीने हा उपक्रम सुरू केला, तेव्हा मी त्यात सहभागी झाले. कंडोम, सॅनिटरी नॅपकीन, हगीज, गुटखा, दारूच्या बाटल्या अशा सर्व प्रकारचा कचरा इथे असतो. आज कर्नाटक, महाराष्ट्र आणि बंगालमधील ३० ते ४८ वयोगटातील १८ महिला स्वच्छतेचे काम करतात. त्यातील निम्म्या महिलांनी पूर्णपणे वेश्या व्यवसाय सोडून दिला आहे.'  

पूजा म्हणाल्या, 'मी इथे २० ते २५ वर्षांपासून आहे. नवरा दारू प्यायचा, मारायचा आणि खायलाही द्यायचा नाही. त्यामुळे मी त्याला तीस वर्षांपूर्वीच सोडले. त्यानंतर एका व्यक्तीने फसवून इथे आणले. मग मी या व्यवसायात ओढल्या गेले. आता मी पूर्णपणे स्वच्छतेचे काम करते. इथे मिळणाऱ्या वेतनातून घर व्यवस्थित चालले आहे. सर्वजण इज्जत देतात. वाईट नजरेने पाहत नाहीत, याचा आनंद वाटतो. पूर्वी धंद्यासाठी मी वेड्यासारखी फिरत असायचे. आज स्थिर झाल्याचे समाधान वाटते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून, मुलगा शाळेत शिकतो. पूर्वी माझ्या घरी मी काय काम करते, ते माहीत नव्हते. मात्र, आता सन्मानाने काम करत आहे.' 

लक्ष्मी म्हणाल्या, 'मी मूळची कर्नाटकची. मिरचीतोड कामगार म्हणून शेतावर जायचे, तेव्हा एका बाईने दररोज एक हजार रुपये मिळतील असे सांगून मुंबईला आणले. नंतर पुण्यात वेश्याव्यवसायाला लावले. माझी भाषा वेगळी. त्यामुळे काय होतंय ते कळत नव्हते. नंतर एक मुलगा झाला. तो काही महिन्यांतच गेला. माझी मुलगी आता मामाकडे शिकायला असते. ती इंग्लिश मीडियममध्ये जाते. तिने नुकतीच दहावी पास केली आहे. आता मी इथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत आहे.'

एएसआर कंपनीर्फे संचालित प्रकल्पाचे सुपरवायझर उमेश गड्डम म्हणाले, 'कंडोम, सॅनिटरी पॅड, गुटख्याने रंगलेल्या बकेट अशा विविध प्रकारचा कचरा इथे असतो. काही जण वेगळ्या पिशव्या अथवा बकेटमध्ये कचरा वेगळा देतात. मात्र, अनेक जणी विशेषतः बंगाली बायका एकाच बकेटमध्ये सर्व प्रकारचा कचरा टाकतात. बकेटमध्ये कंडोमबरोबरच गुटख्याची पिंक आणि मानवी मूत्रदेखील असते. मात्र, आमच्या स्वच्छतादूत ते सर्व वेगळा करतात. ही सुरुवात आहे. हळूहळू कचऱ्याबाबत येथील महिलांमध्ये जागृती येत आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत आम्ही काम करतो. वेश्यालयातील कचरा गोळा करण्याबरोबरच रस्त्यावरील कचराही गोळा करतो. त्यासाठी महापालिकेने आम्हाला तीन कचरागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.'  

सहेली संस्थेच्या तेजस्विनी देशमुख म्हणाल्या, 'वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी आम्ही महिलांना दबाव टाकत नाही. मात्र, एखाद्या महिलेला त्यातून बाहेर पडायचे असल्यास तिला मदत करतो. त्यांना आणि त्यांच्या मुलांनादेखील आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.'

आम्ही वेश्याव्यवसाय सोडून स्वच्छतेचे काम करत आहोत. त्यातून दरमहा ७ तारखेला बँकेत पैसे जमा होतात. ते पाहून अनेक महिला आम्हालाही असे काम करायची इच्छा असल्याचे सांगत आहेत.

- छाया, स्वच्छतादूत

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनाच तेथील परिसरातील स्वच्छतेची कामे द्यायची अशी संकल्पना कोव्हिडनंतर राबवण्यात आली. त्यासाठी एएसआर या कंपनीने मदत केली. त्यांनी येथील महिलांना त्यांच्या पे-रोलवर घेतले. आता प्रत्येक महिलेच्या खात्यात २१ हजार रुपये दरमहा जमा होतात. बुधवार पेठेतील वस्तीत साडेचारशे घरे असून, अंदाजे दोन ते सव्वादोन हजार महिला वास्तव्यास आहेत. तिथे निर्माण होणारा कचरा गोळा करण्याचे काम तेथेच काम केलेल्या महिला करत आहेत, तसेच स्वच्छ संस्थेचे पाच कर्मचारीही त्यांच्या मदतीसाठी आहेत. यातील काही जणींनी वेश्याव्यवसाय सोडूनही दिला आहे.

- तेजस्वी सेवेकरी, कार्यकारी संचालिका, सहेली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest