विद्यार्थ्यांच्या सव्वा तीन लाखांच्या साहित्यांची चोरी

भाड्याने सदनिका घेऊन एकत्र राहणाऱ्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाईल, कपडे, शैक्षणिक आणि आवश्यक कागदपत्रे चोरट्याने लंपास केली आहेत. नऱ्हे धायरी येथील झील चौकातील बळवंत सदन या इमारतीत ही घटना घडली असून या प्रकरणी दिग्विजय मते यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:16 am
नर्हे धायरीच्या झील चौकातील बळवंत सदनमधील चोरीची घटना

विद्यार्थ्यांच्या सव्वा तीन लाखांच्या साहित्यांची चोरी

नऱ्हे धायरीच्या झील चौकातील बळवंत सदनमधील घटना

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

भाड्याने सदनिका घेऊन एकत्र राहणाऱ्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाईल, कपडे, शैक्षणिक आणि आवश्यक कागदपत्रे चोरट्याने लंपास केली आहेत. नऱ्हे धायरी येथील झील चौकातील बळवंत सदन या इमारतीत ही घटना घडली असून या प्रकरणी दिग्विजय मते यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

चोरी झालेल्या वस्तूंत तीन लॅपटॉप, दोन मोबाईल, एक टॅब, हार्ड डिस्क, कपडे, पाकीट आणि आधार, मतदान, पॅन, एटीएम कार्ड अशा महत्त्वाच्या वस्तू आहेत. या साऱ्याची किंमत साधारण तीन लाख २५ हजार आहे. हे विद्यार्थी सर्वसाधारण आर्थिक वर्गातले असून त्यातील काहीजण नोकरी करून शिक्षण घेत आहेत. ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफीचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोटो, शूटिंगचा डाटाही चोर घेऊन गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बळवंत सदन येथे २ बीएचके भाड्याने घेऊन सहा महाविद्यालयीन विद्यार्थी राहतात. हे सर्वजण ग्रामीण भागातील असून नोकरी करत करत शिक्षण घेतात. त्यातील फिर्यादी दिग्वीजय मते हा एका कंपनीत ग्राफिक डिझाईनचे काम करतो. त्याशिवाय तो फोटोग्राफीचा व्यवसायही करतो. त्यांना कंपनीकडून लॅपटॉप मिळाला होता. मात्र त्याचीच चोरी झाल्याने आता तो कंपनीला भरून द्यावा लागला तर पैसे कसे जमा करायचे, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. मते याने एमबीए पात्रता परीक्षा पूर्ण केली आहे. मात्र एमबीएची प्रवेश फी भरण्यासाठी पैसे नसल्याने लगेच प्रवेश घेता येणार नाही.

शनिवारी हे विद्यार्थी रूमवर झोपले होते. उन्हाळ्यात गरम होते म्हणून दोघेजण टेरेसवर झोपायला गेले होते. सकाळी सात वाजता खोलीतील एकाचा गजर वाजला. मात्र रविवार असल्याने गजर बंद करून तो पुन्हा झोपला. वर झोपलेल्या मुलांना रूममध्ये येण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला होता. त्यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रूममध्ये घुसून चोरी केली. अर्ध्या तासाने जाग आल्यावर एकाने मोबाईल शोधला. तो मिळाला नाही. शोध घेऊनही मोबाईल मिळत नसल्याचे पाहून चोरी झाल्याचा संशय आला. रूममध्ये पाहिले त्यावेळी अनेक वस्तू नसल्याचे लक्षात आले. रस्त्यावरील एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एक व्यक्ती बॅगा घेऊन पायी जात असतानाचे आढळले. त्याच्या हातातील बॅगा या विद्यार्थ्यांच्या असल्याचे आढळले. साधारण ३ लाख २५ हजारांच्या वस्तू चोरीला गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

चोरीतील एक मोबाईल आणि लॅपटॉप हप्त्यावर खरेदी केला होता. त्याचे अर्धे हप्ते बाकी आहेत. मात्र चोरी झाले तरी हप्ते भरावे लागणार असल्याने अशी दुहेरी झळ बसणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मते यांची हार्ड डिस्क चोरीला गेल्याने त्यातील फोटो आणि व्हीडीओ शूटिंगचा सगळा डाटा गायब झाला आहे. 

काही ग्राहकांकडून पैसे घेतले होते तर काही ग्राहकांकडून येणे बाकी होते. आता डाटा गेला असल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार किशोर कुंभार तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest