विजेचा धक्का बसून होर्डिंगला चिकटलेल्या युवकाची वाहतूक पोलिसाने केली सुटका

वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे यांनी विजेचा शाॅक बसून होर्डिंगला चिकटलेल्या युवकाचे प्राण वाचवले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 22 May 2023
  • 10:36 am
काळ आला होता पण...

काळ आला होता पण...

विजेचा धक्का बसून होर्डिंगला चिकटलेल्या युवकाची वाहतूक पोलिसाने केली सुटका

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

 

वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे यांनी विजेचा शाॅक बसून होर्डिंगला चिकटलेल्या युवकाचे प्राण वाचवले.

बडे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शनिवारी (दि. २०) नीलेश सुभाष घाटगे (वय २२) या युवकाला जीवदान मिळाले. नीलेश हा होर्डिंग बदलत असताना त्याला शाॅक बसला. तो होर्डिंगला चिकटला असताना बडे यांनी त्याला सोडवले. उपचारासाठी त्याला मांजरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नीलेश आता सुखरूप असून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती बडे यांनी दिली. बडेंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ कदमवाक वस्ती या ठिकाणी शनिवारी नीलेश होर्डिंगवर जाहिरात लावत होता. येथील होर्डिंगच्या शेजारीच विजेची डीपी आहे. ती या होर्डिंगपासून पाच ते दहा फूट अंतरावर आहे. नीलेश होर्डिंगवर जाहिरात लावत असतानाच शॉर्टसर्किट होऊन मोठा आवाज झाला. त्याच वेळी नीलेशला विजेचा धक्का बसून तो होर्डिंगवरच अडकून पडला.

जवळच काही अंतरावरील टपरीवर वाहतूक पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बडे चहा पीत होते. त्यावेळी त्यांनी डीपीचा आवाज ऐकला. थोड्या वेळाने  त्यांना येथील डीपीच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एक मुलगा होर्डिंगवर अडकला असल्याची माहिती मिळाली. बडे यांनी गाडीवरून घटनास्थळी धाव घेतली.  त्याठिकाणी जाऊन ते वर अडकलेल्या नीलेशची विचारपूस करू लागले. परंतु त्याला चक्कर येत असल्याने तो काय बोलत आहे हे बडे यांना ऐकू येत नव्हते. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पण कोणीच मदतीसाठी पुढे सरसावत नव्हता. विद्युत प्रवाहाचा अंदाज घेत बडे  तत्काळ होर्डिंगवर चढले. नीलेशजवळ जाऊन त्याला धीर दिला आणि त्याला सुखरूप खाली घेऊन आले. नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

बडे यांनी तत्काळ या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल आणि मार्शल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नीलेशला मांजरी येथील रुग्णालयात दाखल केले.  तेथे उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे. बडे यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले बडे हे २००० मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मागील दोन वर्षांपासून ते लोणी काळभोर येथील वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ‘‘मी कोणी सुपरमॅन नाही. परंतु परिस्थिती गंभीर होती. होर्डिंग लोखंडी होते आणि जवळच डीपी होती. तिच्या दिव्याचा स्फोट झाल्याने त्याचा विद्युत प्रवाह फलकावर येत होता आणि त्याचा धक्का लागून नीलेश अडकला होता. त्याला खालीही येता येत नव्हते. नीलेशला वाचवून बाहेर काढता आले याचे मला समाधान आहे,’’ अशी प्रतिक्रिया बडे यांनी ‘सीविक मिरर’कडे व्यक्त केली.

धोका असूनही अंमलदार ज्ञानेश्वर बडे हे होर्डिंगवर चढले आणि चिकटलेल्या तरुणाचा जीव वाचवून त्याला सुखरूप खाली आणले. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो.

- अशोक तोरडमल,

वाहतूक पोलीस निरीक्षक,

लोणी काळभोर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest