Ambulance accident : अपघातातील जखमींची रुग्णवाहिकेचा पुन्हा अपघात

देवदर्शनाला जात असलेल्या महिलांच्या खासगी बसला अपघात झाला, म्हणून त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना ती रुग्णवाहिकाच पलटी झाल्याने महिलांची स्थिती आणखी गंभीर झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी फुलगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे हे सलग दोन अपघात झाले. या घटनेत बसमधील १५ महिला जखमी झाल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 23 May 2023
  • 09:24 am
अपघातातील जखमींची रुग्णवाहिकाही पलटी

अपघातातील जखमींची रुग्णवाहिकेचा पुन्हा अपघात

दोन्ही चालकांच्या बेिफकिरीमुळे अपघात झाल्याचा जखमी महिलांचा दावा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

देवदर्शनाला जात असलेल्या महिलांच्या खासगी बसला अपघात झाला, म्हणून त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना ती रुग्णवाहिकाच पलटी झाल्याने महिलांची स्थिती आणखी गंभीर झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी फुलगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे हे सलग दोन अपघात झाले. या घटनेत बसमधील १५ महिला जखमी झाल्या. त्यातील पाच महिलांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिका पलटी होऊन अपघात झाला. या दोन्ही अपघातांमध्ये चालकांनी बेदरकारपणे वाहन चालवल्याचे समोर आले आहे. 

याबाबत चित्रा खरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी साहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील हे मात्र या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले असून, आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, अशी धक्कादायक बाब त्यांनी सांगितली. 

येरवड्यातील मनसेच्या नेत्या दीपाली शिर्के यांनी महिलांसाठी अष्टविनायक सहलीचे आयोजन केले होते. यामध्ये ४६ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी चार गणपतींचे दर्शन शनिवारी दिवसभरात झाल्यावर संध्याकाळी ते फुलगाव येथील मिलिट्री स्कूलच्या वसतिगृहात मुक्कामी थांबले. रविवारी सकाळी तेथून निघाले. पुढील प्रवासासाठी निघायचे म्हणून महिलांनी बसचालकाला उठवले. मात्र, नीट आवरले नसल्याने त्याची चिडचिड झाली. त्यानंतर पुढील प्रवासादरम्यान एका गाडीला ओव्हरटेक करताना त्यांची बस रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये १५ महिला जखमी झाल्या. गावातील नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या महिलांची सुटका केली. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी जवळच्या खासगी रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतून पाच महिलांना नेले जात असताना पाच मिनिटाच्या अंतरावर पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला. यामध्ये रुग्णवाहिका पलटी झाली. पुन्हा अपघात झाल्याने आधीच जखमी असलेल्या महिलांना आणखी एकदा मार लागला. 

अपघात झाला तो रस्ता चांगला असून, केवळ दोन्ही वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडल्याचे महिलांनी सांगितले. अपघातग्रस्त महिला चित्रा खरे यांनी सांगितले की, 'बसच्या अपघातामध्ये माझे दोन दात तुटले. डोळ्याला चांगलाच मार लागला. पुन्हा रुग्णवाहिकेमध्येही त्याच जागेवर मार लागल्याने प्रचंड वेदना झाल्या. बसमध्ये पुढे बसलेल्या १५ महिला जखमी झाल्या. मागील बाजूचे लोक एकमेकांच्या अंगावर पडले होते. सगळ्यांना मुका मार लागला. तेथील जवळच्या नागरिकांनी आम्हाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, अपघातास कारणीभूत असलेल्या बसच्या कंपनीने साधी विचारपूसदेखील केली नाही. आमचे सगळे बिल आम्हीच भरले. अपघात झाल्याने आमची मनःस्थिती स्थिर नव्हती. त्या सगळ्या प्रकारात आमची पर्स चोरीला गेली.' 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest