खोलीच्या वर्णनावरून शोधली बहिण

लग्नाचे आमिष दाखवत नेपाळमधून एका अल्पवयीन मुलीला पुण्यात घेऊन आलेल्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तिस येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुलीचा शोध घेऊन तिची सुटका केली आहे. मोहम्मद रफिक शेख (वय २३) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद रफिक शेखवर भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 26 May 2023
  • 12:26 am
खोलीच्या वर्णनावरून शोधली बहिण

खोलीच्या वर्णनावरून शोधली बहिण

अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवत नेपाळहून पळवले; तंत्रज्ञानाच्या आधारे शोधला येरवड्यात ठिकाणा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

लग्नाचे आमिष दाखवत नेपाळमधून एका अल्पवयीन मुलीला पुण्यात घेऊन आलेल्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तिस येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुलीचा शोध घेऊन तिची सुटका केली आहे. मोहम्मद रफिक शेख (वय २३) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद रफिक शेखवर भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद रफिक शेख (वय २३) हा मूळचा नेपाळमधील आहे. भारतात मजुरीसाठी आलेल्या मोहम्मदने लग्नाचे आमिष दाखवत नेपाळयेथून एका अल्पवयीन मुलीला फसवून पुण्यात आणले होते. येरवडा परिसरात तिला एका खोलीत कोंडून ठेवले होते. मोहम्मद शेख हा अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तसेच दिवसभर तिला खोलीत डांबून ठेवून त्रास देत होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद रफिक शेखने नेपाळ येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मागील काही दिवसांपासून तो पुण्यात कामासाठी राहत होता. मिळेल ते काम तो करत होता. पुण्यातून तो नेपाळला गेल्यावर त्याने तेथील एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 'मी तुझ्यावर प्रेम करतो'  अशी बतावणी करत तिला विश्वासात घेतले. भारतात माझ्याकडे स्वतःचा फ्लॅट, बंगला, गाडी आहे असे खोटेच तिला सांगितले. स्वतः खूप श्रीमंत असल्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आणि सुखी ठेवण्याचे खोटे स्वप्न दाखवले. लग्न करण्याचे आमिष दाखवत मोहम्मद तिला पुण्यात घेऊन आला होता.  या अल्पवयीन मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती त्याच्या भूलथापांना बळी पडत घरच्यांना न सांगता त्याच्यासोबत पुण्यात पळून आली होती. पुण्यात आल्यानंतर त्याने तिला येरवडा परिसरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते.

मोहम्मद हा तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार करू लागला. तसेच तो तिला कोणाशी बोलू देत नव्हता. मोहम्मद हा सध्या बिगारी काम करत होता. तो कामावर जाताना पीडित मुलीला खोलीत कोंडून जात होता. त्याच्या या कृत्यामुळे मुलीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पीडितेने एके दिवशी मोहम्मदला न सांगता त्याचा मोबाईल घेऊन नेपाळ येथील आपल्या भावाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसेच तिला ठेवलेल्या खोलीचे वर्णन सांगितले. तिच्या भावाने पुण्यात धाव घेत हडपसर येथील 'रेस्क्यू' या सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांशी संपर्क केला. संस्थेच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला ही माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली.

तपास करत असताना त्यांनी मुलीने फोन केलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधले. या तांत्रिक विश्लेषणाद्वारे पीडित मुलगी येरवडा येथील गोल्फ क्लब चौक परिसरात असल्याचे समजले. हा परिसर मोठा असल्याने पोलीस तिने आपल्या भावजवळ वर्णन केलेल्या खोलीचा आणि परिसराचा शोध घेऊ लागले. पोलिसांनी त्या वर्णनाची खोली शोधून काढली. त्या खिडकीतून तिने पोलिसांना पाहताच मोठ्याने आवाज देत येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिची सुखरूप सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest