Pune : विनयभंगात पुणे नाही उणे

महिला पोलीस कॉन्स्टेबल, वकील, इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्याने भेटायला गेलेली तरुणी आणि घरकाम करणारी महिला अशा चौघीजणींचा विनयभंग पुणे शहरात विविध ठिकाणी झाल्याप्रकरणी एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले आहेत. चार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 20 May 2023
  • 03:07 pm
विनयभंगात  पुणे नाही उणे

विनयभंगात पुणे नाही उणे

महिला पोलीस, वकील, अल्पवयीन, कामगार यांची तक्रार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

महिला पोलीस कॉन्स्टेबल, वकील, इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्याने भेटायला गेलेली तरुणी आणि घरकाम करणारी महिला अशा चौघीजणींचा विनयभंग पुणे शहरात विविध ठिकाणी झाल्याप्रकरणी एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले आहेत. चार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात आहे.

महिला वकिलाचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवार (दि. १७) दुपारी बाराच्या दरम्यान सेनापती बापट रस्त्यावर ही घटना घडली. दिवसाढवळ्या भररस्त्यावर रिक्षाचालकाने अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत महिलेस शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्याद देताच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला, तर बुधवारीच दुसरी घटना हडपसर येथील एका सिग्नलवर घडली असून, महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या अनुराग माळवदकर (वय ३६, रा. मोरेवस्ती, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर ओळख झाल्याने एक अल्पवयीन मुलगी विशाल तळेकर नामक युवकाला भेटायला गोखलेनगर परिसरात गेली असता तळेकर याने विनयभंग केला.

कोथरूड येथील ३७ वर्षीय महिला वकील बुधवारी दुपारी कोथरूड येथून सेनापती बापट रस्ता येथे जात होत्या. त्यांनी मोबाईल ॲपद्वारे सेवा देणाऱ्या संकेतस्थळावरून ऑनलाईन रिक्षा मागवली होती. कोथरूड येथून त्या सेनापती बापट रस्ता या ठिकाणी याच रिक्षाने आल्या होत्या. त्याचवेळी आरोपी रिक्षाचालक याने महिलेला अर्ध्या रस्त्यावरच सोडले. मात्र महिलेला पुढे जायचे होते. महिलेने रिक्षाचालकास पुढे सोडायला सांगितले. त्या अंतराचे जेवढे पैसे होतील तेवढे मी देते, असेही सांगितले. मात्र आरोपी रिक्षाचालकाने त्यांना अर्ध्यावरच सोडले. त्यावेळी फिर्यादी महिला या रिक्षातून उतरत असताना आरोपी रिक्षाचालकाने त्यांना अत्यंत घाणेरड्या अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या शिवीगाळीतून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी रिक्षाचालकाने केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर वकील महिलेने जवळच्या चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली.

या प्रकरणी पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. फिर्यादीमध्ये एम एच १२ एस के ४२०२ असा या रिक्षाचा नंबर असल्याचे म्हटले आहे. पुणे शहरात ‘मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- २०२०’ नुसार मोबाईल ॲपद्वारे सेवा देणाऱ्या संकेतस्थळावरून ऑनलाईन रिक्षांचा परवाना आवश्यक बाबींची पूर्तता केली नसल्याने पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने नाकारला आहे. तरीही या रिक्षा चालू असल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.

विमाननगर येथील लुंकड अबाउट सोसायटीत घरकामासाठी जात असलेल्या महिलेला अश्लील चाळे करून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. शेख अबुझर शेह सहजाद (वय २२, रा. बैंगनवाडी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार महिला या विमाननगर येथील लुंकड अबाउट सोसायटीमध्ये घरकाम करतात. नेहमीप्रमाणे त्या येथील सोसायटीत घर कामासाठी जात असताना सोसायटीच्या आवारात आरोपी शेखने त्यांच्याशी जवळीक साधत बोलण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest