आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत कमी असल्याने त्यासाठी 'पिंक' मोहीम उभारण्यात आली होती. मात्र, ज्यांच्यासाठी स्वच्छतागृहेच नाहीत, त्यांनी जायचे कोठे या कुचंबणेतून तृतीयपंथीयांची सुटका आता होणार आहे. पुणे महापालिकेने तृतीयपंथींसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १३ क्षेत्रीय कार्यालयातील ३७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:11 am
आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

पुणे महापालिका उभारणार १३ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विविध ३७ ठिकाणी स्वच्छतागृहे

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत कमी असल्याने त्यासाठी 'पिंक' मोहीम उभारण्यात आली होती. मात्र, ज्यांच्यासाठी स्वच्छतागृहेच नाहीत, त्यांनी जायचे कोठे या कुचंबणेतून तृतीयपंथीयांची सुटका आता होणार आहे. पुणे महापालिकेने तृतीयपंथींसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १३ क्षेत्रीय कार्यालयातील ३७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.  

समाजातील इतर घटकांप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी 'द ट्रान्सजेंडर पर्सन्स' (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) ॲक्ट २०१९ अंतर्गत त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यांनाही इतरांप्रमाणेच सार्वजनिक सोयी-सुविधांचा वापर करता यावा यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना समाजातील एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून वागणूक मिळत होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने काही तृतीयपंथींना नोकरीत सामावून घेतले आहे. तृतीयपंथींनी केलेल्या संघर्षानंतर पोलीस भरतीत त्यांच्या श्रेणीचा पुरुष आणि महिलांबरोबर स्वतंत्र उल्लेख करण्यात आला. पुणे महापालिकेने त्यांच्यासाठी नोकरभरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अजूनही तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे हा विचार रुजलेला नाही. यात बदल करीत पुणे महापालिकेने नवीन इमारतीत तृतीयपंथींसाठीही एक स्वच्छतागृह सुरू करून चांगले पाऊल टाकले आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या १३ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३७ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत. त्यातील सर्वाधिक ८ स्वच्छतागृहे नगर रोड-वडगाव शेरी भागात उभारण्यात येणार आहेत. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६, तर धनकवडी-सहकारनगर, ढोले-पाटील रस्ता आणि वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी ४ स्वच्छतागृह उभारण्यात येतील.

फ्लाईंग वूमन फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष छायावती देसले म्हणाल्या, 'सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रचलित व्यवस्थेत पुरुष आणि महिला अशा दोन वर्गांचा प्राधान्याने विचार केला जातो. तृतीयपंथी व्यक्तींनी जायचे कोठे. त्यांनी पुरुषांच्या स्वच्छतागृहाचा वापर करायचा ठरवल्यास त्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो. विनयभंग अथवा अत्याचाराच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जर त्यांनी महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर करायचा ठरवल्यास इतर महिला त्यांना पाहून घाबरतील. अशा वेळी त्यांची कुचंबणा होते. नैसर्गिक विधी फार काळ रोखल्यास मूतखडा आणि इतर शारीरिक व्याधी होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावीत अशी मागणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला केली होती. आता काही सरकारी कार्यालयात अशी व्यवस्था केली आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक स्वच्छतागृहात त्यांना स्थान दिलेले नाही. सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि खासगी इमारतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत तृतीयपंथीयांसाठी वेगळी सुविधा व्हावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest