पालिकेचे दुर्लक्ष महिलेच्या जीवावर

खासगी इमारतीच्या आवारातील भले-मोठे सुकलेले झाड वेळेवर न तोडल्याने ते एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेच्या गेटशेजारी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळा सुरू नसल्याने परिसरात विद्यार्थ्यांसह इतर वर्दळ तुलनेने कमी होती, अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:20 am
पालिकेचे दुर्लक्ष महिलेच्या जीवावर

पालिकेचे दुर्लक्ष महिलेच्या जीवावर

मुक्तांगण शाळेजवळ कुजलेले मोठे झाड रिक्षावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; धोकादायक झाडांबाबत पालिका निष्क्रिय

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

खासगी इमारतीच्या आवारातील भले-मोठे सुकलेले झाड वेळेवर न तोडल्याने ते एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेच्या गेटशेजारी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळा सुरू नसल्याने परिसरात विद्यार्थ्यांसह इतर वर्दळ तुलनेने कमी होती, अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा परिसरात सुरू आहे. 

लीला काकडे (वय अंदाजे ४५ ते ५०, रा, जांभूळवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. नम्रता सचिन पोळ (वय ४६), कमल अडिकामे (वय ६९), मीना पुरुषोत्तम पोळ (वय ६१) या महिला आणि त्यांचा तीन वर्षांचा लहान मुलगा हे सुदैवाने या अपघातातून बचावले. लहान मुलगा आणि रिक्षाचालकाचे नाव समजू शकलेले नाही. मुक्तांगण शाळेजवळील बसस्टॉपच्या मागील आवारात असलेले मोठे झाड पडले. झाडाचा मोठा ओंडका डोक्यात पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी 'सीविक मिरर'ला सांगितले. मुक्तांगण शाळेशेजारी असलेल्या रहिवासी इमारतीत कॉट बेसिसवर काही रूम भाड्याने दिल्या असून, एक कोचिंग क्लास आणि स्टेशनरीचे दुकान आहे. याच इमारतीच्या आवारात सुकलेले झाड होते.

काकडे या योगा क्लासवरून पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील मध्यवस्तीत रिक्षातून चालल्या होत्या. त्यावेळी झाडाचा ओंडका त्या बसलेल्या बाजूने पडला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रिक्षाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, इमारतीजवळ असलेल्या एका टपरीचेही नुकसान झाले. पडलेले झाड कुजले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

स्थानिक रहिवासी प्रतीक बनसोडे म्हणाले, 'शिवदर्शन भागातील धोकादायक झाडे तोडण्याबाबत, तसेच जास्त विस्तार असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याबाबत महापालिकेला नोव्हेंबर २०२२ मध्येच तक्रार दिली होती. त्यानंतरही पाहणी करून झाडे तोडली नाहीत. खासगी सोसायट्यांनी तक्रार केल्यानंतरही वेळेवर कार्यवाही केली जात नाही, असा अनुभव आहे. वेळेवर कार्यवाही केली असती, तर ही दुर्घटना टळू शकली असती. आता याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.'

सामाजिक कार्यकर्ते अमित बागूल म्हणाले, 'सायंकाळी पाचच्या सुमारास रिक्षावर झाड कोसळून अपघात झाला. झाड मोठे होते. मात्र, अगदी सुकलेले होते. अपघातानंतर तातडीने काही जणांसमवेत तिथे पोहचलो. संबंधित महिला रक्ताने माखलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल टाकून त्यांना आम्ही रुग्णवाहिकेत ठेवले. मुक्तांगण शाळेशेजारीच ही दुर्घटना घडली. शाळा सुरू नसल्याने अनर्थ टळला. अन्यथा या झाडपडीचे गांभीर्य कैकपटीने वाढले असते.'

'शाळेशेजारील रहिवासी इमारतीत आणखी दोन वाळलेली झाडे आहेत. महापालिकेने त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली पाहिजे. खासगी इमारतीतील झाडे तोडण्याची जबाबदारी संबंधितांची असते. मात्र, एखादा व्यक्ती झाड तोडण्यास सक्षम नसेल. घरात केवळ वृद्ध माणसे असतील, तर धोकादायक झाडे पाडली जाणारच नाहीत का? याची जबाबदारी कोण घेणार? महापालिका खासगी म्हणून संपूर्णतः जबाबदारी टाळू शकत नाही. यावर तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. या घटनेनंतर तरी धोकादायक झाडांची पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिसरातील सर्वच झाडांची पाहणी करण्याची मागणी करणार आहोत', असे बागूल यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest