टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या सात गोदामांना आग

पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड गोदामाला गुरुवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाकडाचे साहित्य असलेले सात ते आठ गोदाम जळून खाक झाले असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 26 May 2023
  • 12:51 am
टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या सात गोदामांना आग

टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या सात गोदामांना आग

जीिवतहानी नाही; लाखो रुपयांचा माल भस्मसात

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड गोदामाला गुरुवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाकडाचे साहित्य असलेले सात ते आठ गोदाम जळून खाक झाले असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे लागलेल्या भीषण आगीत लाकडांनी भरलेली सात गोदामे जळून खाक झाली. पुणे महापालिका, कँटोन्मेंट, पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी साडेदहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. यात कोणीही जखमी झाले नाही आणि जीवितहानीही झालेली नाही. पुण्यात भवानी पेठ येथील टिंबर मार्केट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लाकडाच्या उत्तम वस्तु मिळतात. रोज येथे लाकूड व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. गोदामांमध्ये लाकडी वस्तू व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या असतात. गुरुवारी पहाटे येथे आग लागली. 

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेजारील शाळा आणि काही घरांनाही आगीच्या झळा बसत होत्या. आग इतकी भीषण होती की, लांबच्या अंतरावरून धुराचे आणि आगीचे प्रचंड लोट दिसत होते. वस्तीमध्ये आग पसरू नये, यासाठी जवानांनी तत्काळ गोदामाशेजारी असलेल्या घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठा धोका टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे मनपा, पुणे कँटोन्मेंट, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल अशी एकूण ३० अग्निशमन वाहने व पाण्याचे खासगी टँकर दाखल झाले होते.  या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे अग्निशमन दलाचे प्रसिद्धीप्रमुख नीलेश महाजन यांनी ही माहिती दिली.

गोदामाशेजारी असलेल्या महापालिकेच्या रफी अहमद किडवाई उर्दू शाळेतील आठ-दहा खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शाळेच्या कार्यालयातील साहित्यही जळून खाक झाले आहे. गुरुवार असल्याने पाणी नाही, पाण्याचा दाब कमी असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अडचण आल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. जवळपास पाच तास आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालले होते.

या आगीमध्ये मधुर ट्रेडर्स- राहुल संघवी, वर्धमान एंटरप्रायझेस- प्रकाश मुथा, नतमल मुलाजी ओसवाल, अशोक ओसवाल, नॅशनल टिंबर- नालचन ओसवाल, मनोज टिंबर्स- बाळासाहेब ओसवाल, गुलाब टिंबर्स- गुलाब ओसवाल यांची लाकडाची गोदामे जळून खाक झाली. तसेच, संतोष गायकवाड, हेमंत साबळे, रवी लडकत, दिलीप पांडे, दिनेश शेठ, सुदेश लडकत, गणेश लोणकर, विजू लडकत आदींच्या घरांचे नुकसान झाले आहे. क्रिस्टल कर्विल अँड इंजिनीअरिंगचे कटिंग मशिन जळून खाक झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest