Marriage registrars : एनआयसीच्या त्रासाला कंटाळून विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतःच विकसित केली संगणप्रणाली

राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या संगणक प्रणालीमुळे सर्वच सरकारी कार्यालय त्रासली आहेत. विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. नोंदणी पद्धतीने होणाऱ्या लग्नघटिकांची नियोजित वेळ टळत असल्याने मुद्रांक विभागाने एनआयसीवर विसंबून न राहता स्वतःच संगणक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 23 May 2023
  • 08:50 am
नोंदणीकर्ते ठरले ‘विघ्न’हर्ते

एनआयसीच्या त्रासाला कंटाळून विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतःच विकसित केली संगणप्रणाली

'एनआयसी'च्या त्रासाला कंटाळून विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतःच विकसित केली संगणक प्रणाली; विवाहाच्या नोंदणीतील अडसर दूर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या संगणक प्रणालीमुळे सर्वच सरकारी कार्यालय त्रासली आहेत. विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. नोंदणी पद्धतीने होणाऱ्या लग्नघटिकांची नियोजित वेळ टळत असल्याने मुद्रांक विभागाने एनआयसीवर विसंबून न राहता स्वतःच संगणक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. आता ही संगणक प्रणाली प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज झाली असून त्याची पुण्यात मंगळवारपासून (२३ मे) सुरुवात केली जाणार आहे. तर, येत्या २९ मे पासून राज्यभरात सर्वत्र ही प्रणाली लागू होणार आहे.    

प्रादेशिक परिवहन विभाग असो की मुद्रांक व नोंदणी विभाग (आयजीआर) असो, सर्व  सरकारी खात्यांना एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा पुरवण्यात येते. परिवहन विभागात शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहनाची मालकी हस्तांतरण अशी नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली सेवा दिली जाते, तर सदनिका, जमीन खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी, गिफ्ट डीड, कुलमुखत्यारपत्र, घरे आणि दुकानांचे भाडेकरार, मृत्युपत्र नोंदणी, विवाह नोंदणी अशी विविध प्रकारची कामे मुद्रांक व नोंदणी विभागामार्फत केली जातात. मात्र या दोन्ही विभागांची संगणक प्रणाली व्यवस्थित काम करत नाही. भाडेकरार नोंदवताना अनेक अडचणी येत होत्या. कधी साईट सुरू होत नाही, तर कधी बायोमेट्रिक सुरू होत नाही, तर कधी एरर येत होती. असंख्य अडचणी असल्याने ऑनलाईन काम जीकिरीचे झाले आहे. त्यामुळे भाडेकरार नोंदणी करणाऱ्या अधिकृत एजंट्सने गेल्या आठवड्यात मुद्रांक कार्यालयासमोर आंदोलन केले. तशाच संगणकीय अडथळ्यांनी विवाह नोंदणीसारख्या महत्त्वाच्या गोष्टींतही अडथळे येत होते.

विवाह ही संकल्पना आपल्या समाजात पवित्र मानली जाते. नोंदणी प्रक्रियेसाठी आलेले वधू-वर आणि त्यांच्या आप्तेष्टांना संगणकीय प्रणालीतील अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने वधू-वर आणि त्यांच्या आप्तेष्टांना ताटकळत बसावे लागत होते. दिलेली नियोजित वेळ टळून गेली तरी विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे आनंदाच्या क्षणावर ओरखडे ओढल्यासारखे होत होते. संगणकीय प्रणालीतील येणाऱ्या अडथळ्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार एनआयसीकडे तक्रार करावी लागत होती. त्यांनी दुरुस्ती केल्याशिवाय काम पूर्ववत होण्यात अडथळे येत होते. संगणकीय प्रणालीत सातत्याने येणाऱ्या अडथळ्यांना कंटाळून आयजीआर विभागाने स्वतःच्या अधिकाऱ्यांमार्फत संगणक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. 

अधिकाऱ्यांनी हे आव्हान पेलत नवीन संगणक प्रणाली विकसित केली. अधिकाऱ्यांनीच हे काम केल्याने संगणक प्रणालीसाठी आयजीआर विभागाला वेगळा खर्च करावा लागला नाही. केवळ पेमेंट आणि इतर काही बाबींसाठी एनआयसीची मदत घेतली. आयजीआर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या विभागासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असेल, असा दावा काही अधिकाऱ्यांनी केला.    

मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख म्हणाले, विवाह नोंदणी कार्यालयात एनआयसीने विकसित केलेली संगणक प्रणाली वापरली जात होती. ती १.९ व्हर्जनची होती. त्यात सातत्याने अडथळे येत होते. कधी नोटीस जनरेट होत नव्हती. कधी रजिस्टर करताना फोटो कॅप्चर होत नव्हता. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करताना विविध टप्प्यांवर तांत्रिक अडचणी येत होत्या. अडथळा आल्यास प्रत्येक गोष्टीत एनआयसीवर अवलंबून राहावे लागत होते. आता नव्या २.० प्रणालीमुळे अडचणी येणार नाहीत. काही अडचणी आल्यास आमचे अधिकारीच आपल्या स्तरावर त्या सोडवू शकतील.  

शहरात दररोज होतात ३२ नोंदणी विवाह

राज्यात २०२२-२३ मध्ये नोंदणी पद्धतीने ३४ हजारांहून अधिक विवाह झाले आहेत, तर, पुण्यात ७ हजार ९०० हून अधिक विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत. शनिवार, रविवारची सुट्टी आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळल्यास विवाह नोंदणी कार्यालयाचे कामाचे सुमारे २४० दिवस होतात. त्यानुसार राज्यात दररोज सुमारे १४१ आणि पुण्यात ३२ विवाह नोंदणी पद्धतीने होतात.

एनआयसीने विकसित केलेल्या संगणक प्रणालीत वारंवार अडथळे येत होते. त्यामुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आयजीआरच्या अभियंत्यांनाच नवीन प्रणाली विकसित करण्यास सांगितली. त्यांनी त्यावर महिनाभर काम केले. त्याची चाचणी घेतली. नगरमध्ये पथदर्शी प्रयोग करण्यात आला. मंगळवारपासून (२३ मे) पुण्यात याची अंमलबजावणी सुरू होईल, तर २९ मे पासून राज्यभरातील विवाह नोंदणी कार्यालयात नवीन २.० प्रणालीवर कामकाज सुरू होईल.

- अभिषेक देशमुख, उपमहानिरीक्षक मुद्रांक आणि नोंदणी विभाग (संगणक)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest