रस्ता बांधकामातून स्टील, सिमेंट, पॉलिथिन शिट गायब झाल्याने महिन्याभरात रस्त्याला पडले तडे

सार्वजनिक बांधकाम विभागाने लोहगाव येथे बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्याला महिनाभरातच तडे गेले आहेत. एक किलोमीटर अंतराच्या रस्ता कामाला ४ कोटी २७ लाखांचे बजेट होते. मात्र, कोट्यवधींचा पैसा खर्च करूनही रस्ता बांधकामात स्टील, एम ३० ग्रेडचे सिमेंट, पॉलिथिन शीट यांचा वापरच केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हा रस्ता उखडून पुन्हा नव्याने दर्जेदार रस्ता बांधवा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 26 May 2023
  • 12:39 am
रस्ता बांधकामातून स्टील, सिमेंट, पॉलिथिन शिट गायब झाल्याने महिन्याभरात रस्त्याला पडले तडे

रस्ता बांधकामातून स्टील, सिमेंट, पॉलिथिन शिट गायब झाल्याने महिन्याभरात रस्त्याला पडले तडे

लोहगावला रस्ता बांधकामातून स्टील, सिमेंट, पॉलिथिन शीट गायब; अवघ्या महिनाभरात तडे

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

सार्वजनिक बांधकाम विभागाने लोहगाव येथे बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्याला महिनाभरातच तडे गेले आहेत. एक किलोमीटर अंतराच्या रस्ता कामाला  ४ कोटी  २७ लाखांचे बजेट होते. मात्र, कोट्यवधींचा पैसा खर्च करूनही रस्ता बांधकामात स्टील, एम ३० ग्रेडचे सिमेंट, पॉलिथिन शीट यांचा वापरच केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हा रस्ता उखडून पुन्हा नव्याने दर्जेदार रस्ता बांधवा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

लोहगाव येथील इंडियन पेट्रोल पंपापासून दादाची वस्ती या मार्गावर एक किलोमीटर अंतराचा सिमेंटचा रस्ता  नुकताच बांधण्यात आला. मागील आठ महिन्यापासून त्याचे काम चालले होते. एक किलोमीटर लांबीच्या या रस्स्याची निविदा ४ कोटी  २७ लाखांची आहे.  मात्र याच्या बांधकामांत एम ३० ग्रेडचे सिमेंट, स्टील, पाॅलिथीन शीट, रस्त्याच्या वरच्या बाजूस डांबरी आवरण न टाकताच तो बनवल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याला भेगा पडल्या आहेत. तसेच रस्त्यावरील सिमेंटचे थर जाऊन खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. 

या कामावर नागरिक प्रचंड नाराज असून हे काम म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचे ते म्हणतात.

गेल्या चार दिवसांपूर्वी या रस्त्याखालील जलवाहिनी फुटली आणि गळती सुरु झाली. त्यामुळे दुरुस्तीसाठी पालिकेने येथील खोदकाम सुरु केले. विशेष म्हणजे नुकताच बांधलेला हा सिमेंटचा रस्ता अगदी सहजपणे खणला जात होता. त्यासाठी विशेष यंत्राची आवश्यकता भासली नाही. सिमेंटचा रस्ता मातीत खोदकाम करावे तसे कामगारांनी टिकावाच्या साहाय्याने खोदला, असे येथील रहिवासी सागर खांदवे यांनी सांगितले. कोटीच्या घरात पैसा खर्च करूनही लगेचच त्याचे उत्खनन होत असेल. त्यावर भेगा पडून खड्डे पडत असतील तर हा पैशांचा अपव्यय आहे. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची चोकशी करून कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. रस्ता बांधल्यानंतर तो किमान २५ वर्ष तरी भक्कम राहिला पाहिजे. मात्र,येथे पंचवीस दिवसांतच उखडला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ता बांधताना पाणी भरण्यासाठी छोटे चौकोन केले होते. रस्ता पूर्ण जाल्यावर हे चौकोन तसेच होते. याचा त्रास होत असल्याने दुकानदारांनी वेळ आणि पैसा खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम केले आणि आपला त्रास कमी केला.

याबबात माहिती सेवा समितीचे शहर उपाध्यक्ष सागर खांदवे म्हणाले की, रस्त्याचे काम करत असताना तळाला चार इंचाचे काँक्रीट करणे आणि त्यावर पॉलिथिन शीट टाकावयास हवी होती. त्यामुळे जमिनीतील उष्णता रोखली जाते आणि भेगा पडण्यापासून रस्त्याचे संरक्षण होते. रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले आहे. यामध्ये टायबार वापरणे गरजेचे होते. मात्र, रस्ता तयार करताना हे काहीच केलेले नाही. मी येथेच राहायला असल्याने माझ्यासमोर हे काम झाले आहे. जलवाहिनी खोदताना ब्रेकरची गरजच पडली नाही. यावरुन कामाचा दर्जा लक्षात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार काम उत्तम दर्जाचे झाले आहे, तर रस्त्यावर भेगा कशा पडतात? 

सामाजिक कार्यकर्ते  चंद्रकांत वारघडे म्हणाले की, रस्त्याचे बांधकाम निकषानुसार झाले नाही. एम ३० सिमेंटमध्ये  वातावरणातील ऊन, वारा, पावसाचा सामना करण्याची क्षमता आहे. कोणत्याही बांधकामात स्टील लागते, त्याचा येथे अभाव आहे. आता पूर्ण रस्ता उखडून नव्याने बांधण्यात यावा. अन्यथा, रस्त्यावर उपोषण करण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest