मरणानंतर पाण्यानेही छळले

पुण्यातील पाण्याचा प्रश्न जगतानाही आणि मेल्यानंतरही पाठलाग करत असल्याचे दिसते. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट स्मशानभूमीत गेल्या आठ दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 22 May 2023
  • 10:30 am
मरणानंतर पाण्यानेही छळले

मरणानंतर पाण्यानेही छळले

बर्निंग घाट स्मशानभूमीत आठ दिवस पाण्याचा ठणठणाट; बाहेरच्या पाण्यावर उरकले जातात अंत्यसंस्कार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुण्यातील पाण्याचा प्रश्न जगतानाही आणि मेल्यानंतरही पाठलाग करत असल्याचे दिसते. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट स्मशानभूमीत गेल्या आठ दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी अनेक गोष्टींकरिता पाणी आवश्यक असते. अंत्यविधी करताना अंघोळ करणे, केस कापणे, माठ फिरवणे, राख सावडणे, दशक्रिया विधी, अशा अनेक विधींसाठी पाणी गरजेचे असते. तसेच मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी पाण्याची प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. नैवेद्य बनवण्यासाठी, मृतदेहास शेवटचे पाणी पाजण्यासाठी, विधी करून झाल्यानंतर हात-पाय धुण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी पाण्याची गरज असते. त्यातच येथील स्वच्छतागृहातही गेल्या आठ दिवसांपासून पाणी उपलब्ध नाही. अशा बिकट स्थितीत अंत्यविधी उरकण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. त्यात बराच वेळ जात असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्यांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागते. स्मशानभूमीतील पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून प्रशासन मृताच्या आणि नातेवाईकांच्या भावनांशी क्रूर खेळ खेळत आहे.  

कोट्यवधी रुपये खर्च करून कोरेगाव पार्क येथे बर्निंग घाट स्मशानभूमी बांधली आहे. येथील परिसरातील सर्व धर्मीय मृतांचे अंत्यविधी या स्मशानभूमीत होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले पाणीच येथे उपलब्ध नाही. त्यामुळे विधीसाठी आलेल्यांची मोठी अडचण होत आहे. त्यांना अंत्यसंस्कारही उरकावे लागत आहेत. एका मृताच्या नातेवाईकाने सीविक मिररला सांगितले की, आम्ही अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलो होतो. विधी करताना मृताभोवती माठ खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा घालाव्या लागतात. त्यासाठी लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने विधी करण्यासाठी मोठी गैरसोय झाली. आम्हाला विधीसाठी  बाहेरून पाणी आणावे लागले. त्यानंतर प्रदक्षिणा विधी करण्यात आला. बाहेरून पाणी आणण्यातही अडचणी आल्या. आवश्यक तेवढे पाणी आणणे शक्य नव्हते. आणलेले  पाणी विधीसाठी पुरेसे नसल्याने बाकीचे विधी पाण्याशिवाय करावे लागले.

आणखी एक नागरिक आपल्या अनुभवाविषयी म्हणाला की, दोन दिवसांपूर्वी माझ्या मित्राच्या वडिलांचा दशक्रिया विधी होता. त्यासाठी आम्ही बर्निंग घाट स्मशानभूमीत गेलो. त्यावेळी तेथील नळाला पाणीच नव्हते. दशक्रियेच्या दिवशी पूजा, मुंडण, अंघोळ आदींसाठी पाण्याची गरज असते. पाणीच नसल्याने बाहेरून आणलेल्या पाण्यावर आम्हाला विधी उरकावे लागले. 

कोरेगाव पार्क जवळच्या स्मशानभूमीसाठी कोट्यवधींचा खर्च पुणे महानगरपालिकेने केला आहे. या ठिकाणी स्वच्छतागृह, नदीकाठी विधीसाठीचे घाट, इतर विधीसाठी आवश्यक दगडी कठडे अशा सगळ्या सुविधा उभारल्या आहेत. आसपासच्या नागरिकांना नातेवाईक किंवा परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी येथे यावे लागते. भिन्न धर्मीयांचे अंत्यसंस्कार येथे होत असल्याने धर्मानुसार अंत्यविधीच्या वेगवेगळ्या प्रथाही आहेत. मात्र सगळ्यांना अंतिम विधीसाठी पाण्याची गरज भासते. गेल्या आठ दिवसांपासून स्मशानभूमीत पाणीच उपलब्ध नसल्याने अंत्यविधीमध्ये अडचणी येत आहेत. पाणी नसल्याने त्यांना मृतदेह स्मशानभूमीतच ठेवून बाहेरून पाणी आणावे लागते. यावेळी नातेवाईकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे.

स्मशानभूमीत पाणी का उपलब्ध नाही हे क्षेत्रीय कार्यालयात चौकशी केल्यावर कळेल. तेथील स्थानिक व्यवस्थापन हे त्यांच्याकडे आहे. येथे पाणी का उपलब्ध नाही, त्यात काय अडचणी आहेत, याची माहिती घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पावले टाकावी लागतील.

- कल्पना बळीवंत, आरोग्य अधिकारी

बर्निंग घाट स्मशानभूमीत दहनासाठी एकूण पाच गाळे आहेत. शिवाय एक विद्युतदाहिनी आहे. विधीसाठी पाणीच नसल्याने कसेबसे  विधी करावे लागत आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांस फोनवर पाण्याविषयी विचारले असता त्यांना याची काहीच माहिती नसल्याचे आढळले. शिवाय स्मशानभूमीची  दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यामध्ये वरून मृतदेहावर पाणी गळत असते. मात्र अजूनही यात बदल केलेला नाही. मृतदेहावर तरी अंतिम संस्कार व्यवस्थित होतील आणि मृताला शांतता लाभेल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या करातून उभारलेल्या स्मशानभूमीत मृतांना अखेरचा दंडवत तरी व्यवस्थित घालता येईल, याकडे पालिकेने लक्ष द्यावे. 

- संजय कवडे, सामाजिक कार्यकर्ते

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest