अर्चना आत्राम यांच्यासह पाच महिला चालकांचे पथक एसटीमध्ये झाले कार्यरत

मोटरसायकलच काय तर कधी सायकलही चालवली नाही. गिअर, ॲक्सिलेटर काय हे देखील माहीत नव्हते. मात्र, थेट एसटी बसच हाती आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत चालक म्हणून रुजू झाल्यानंतर अर्चना आत्राम यांनी सीविक मिररकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आत्राम यांच्यासह पाच महिलांच्या हाती बसचे सारथ्य असणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:15 am
अर्चना आत्राम यांच्यासह पाच महिला चालकांचे पथक एसटीमध्ये झाले कार्यरत

अर्चना आत्राम यांच्यासह पाच महिला चालकांचे पथक एसटीमध्ये झाले कार्यरत

अर्चना आत्राम यांच्यासह पाच महिला चालकांचे पथक झाले कार्यरत

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

मोटरसायकलच काय तर कधी सायकलही चालवली नाही. गिअर, ॲक्सिलेटर काय हे देखील माहीत नव्हते. मात्र, थेट एसटी बसच हाती आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत चालक म्हणून रुजू झाल्यानंतर अर्चना आत्राम यांनी सीविक मिररकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आत्राम यांच्यासह पाच महिलांच्या हाती बसचे सारथ्य असणार आहे.

बस आणि तीही ग्रामीण भागातील रस्त्यावर धावणारी... या लांब पल्ल्याच्या प्रवासात एसटीसारख्या अवजड वाहनासाठी पुरुषच हवेत ही मानसिकता आता गळून पडली आहे. महिलादेखील तेवढ्याच ताकदीने बसचे स्टेअरिंग हातात घेऊ शकतात, हे या चालकांनी सिद्ध केले आहे. 

शहरी भागात रिक्षा, स्कूल व्हॅनवर महिला चालक दिसू लागल्या आहेत. मात्र, मोठ्या प्रवासी वाहनांच्या स्टेअरिंगवर महिला क्वचितच दिसतात. ग्रामीण भागातील या मुलींनी एसटीचे स्टेअरिंग हाती घेत इच्छाशक्तीप्रमाणे आमचे मनगटही तितकेच भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे. प्रवासी बस चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन पाच महिला सहा आणि सात जूनला एसटीच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. आणखी एक महिला लवकरच दाखल होणार आहे. म्हणजे पुणे विभागात सहा महिला एसटीच्या बसचे सारथ्य करताना दिसतील. 

अर्चना आत्राम, भाग्यश्री भगत, चंचल घोडके, रेश्मा ठुबे, अंजुम शेख या बसचालक म्हणून रुजू झाल्या असून, मुक्ता जाधव यांना लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे. सुरेश शेडगे, मारुती खळदकर आणि चंद्रकांत शितोळे या प्रशिक्षकांनी बस चालविण्याचा आत्मविश्वास दिल्याचा उल्लेख या महिला बस चालकांनी आवर्जून केला.

अर्चना आत्राम म्हणाल्या की, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मी रहिवासी आहे. आई-वडील शेती करतात. कापूस, तूर आणि ज्वारी ही मुख्य पिके. मी देखील आई-वडिलांना शेतात मदत करत होते. 

लहानपणी मी आई-वडिलांबरोबर एसटी बसने अनेकदा प्रवास केला आहे. तेव्हापासून बस चालकाविषयी मला कुतूहल होते. प्रवाशांनी गच्च भरलेली इतकी मोठी गाडी कसे चालवितात याचे मला अप्रूप वाटत होते. मी बस चालवू शकेल का, हा संशय मनात  कायम होता. एसटी बस चालकासाठी निवड झाली तेव्हा मला मोटरसायकलच काय तर सायकलही येत नव्हती. इच्छा तर होती. ब्रेक, ॲक्सिलेटर काय असते हे माहीत नव्हते. स्टेअरिंग कसे हाताळायचे याचेही ज्ञान नव्हते. 

प्रशिक्षक सुरेश शेडगे यांनी मला विश्वास दिला. त्यानंतर मी बस चालक व्हायचे निश्चित केले. त्यामुळे मला बीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देता आली नाही. आता काम करताना मी बीएची पदवी पूर्ण करणार आहे.

शेतकरी असलेल्या आई-वडिलांनी आम्हा भावंडांना चांगले शिक्षण दिले. माझा भाऊ डॉक्टर झाला असून तो माहूर येथील सरकारी रुग्णालयात सेवा बजावतो. आज मी एसटीची चालक म्हणून रुजू झाले आहे. लोकांना सुखरूप वेळेवर पोचवण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. मी जेव्हा सासवड नीरामार्गे राख येथे गाडी चालवत होते, तेव्हा लोकांना नवल वाटले. ते माझ्याबरोबर सेल्फी घेत होते. त्यांनी माझा फोटो काढला. त्यांना माझे कौतुक वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते, अशी प्रतिक्रिया २८ वर्षीय आत्राम यांनी दिली.    

शिरूर-अहिर फाटा या मार्गावर मी बस चालवली. तेव्हा लोकांनी खूप कौतुक केले. प्रवाशांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केल्याची प्रतिक्रिया अंजुम शेख यांनी सीविक मिररकडे व्यक्त केली. भाग्यश्री भगत म्हणाल्या, मी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील आपटी येथील रहिवासी आहे. आई सुरेखा आणि वडील राजू शेतकरी आहेत. मोठी बहीण, एक लहान बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. बहीण वृषाली वाणिज्य शाखेची पदवी घेत असून, भाऊ सूरज कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे. मी एमएसडब्ल्यू आणि एमए पदवीधर आहे. मी देखील आई-वडिलांच्या सोबत शेतात काम करत होते. एसटीत महिला चालक भरतीची जाहिरात आली होती. ती परीक्षा देऊन मी भरती झाले.

चंचल घोडके म्हणाल्या, मी मूळची लोणी-प्रवरा येथील. माझ्या वडिलांचा ड्रायक्लिनिंगचा व्यवसाय आहे. पतीही याच व्यवसायात आहे. 

दोन्ही घरात मी मुलगी म्हणून वाहन चालवू नको असे कधी बंधन नव्हते. एसटी बस चालवण्यापूर्वी मला मोपेड, मोटारसायकल आणि मोटारकार चालवायला येत होती. त्यामुळे काहीसा आत्मविश्वास होता. मात्र, बस एक प्रवासी वाहन आहे. ते जबाबदारीचे काम आहे. 

पूर्वी प्रवासी म्हणून मागे आयतं बसून केवळ प्रवासाचा आनंद घ्यायचा होता. आता प्रवाशांना सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी आहे. शिरूर-न्हावरा-चौफुला असा प्रवास केल्यानंतर एका आजीला मी विचारले की प्रवास कसा झाला. तेव्हा तिने माझा हातात हात घेऊन चांगली गाडी चालवल्याची पावती दिली. गाडी चालवण्याचा हा विश्वास मला सुरेश शेडगे, मारुती खळदकर आणि चंद्रकांत शितोळे यांच्यासारख्या प्रशिक्षकांकडून मिळाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest