मेट्रोकडून पिंपरीत पे ॲण्ड पार्कचे काम सुरू
मेट्रोच्या वाहनतळाअभावी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनाच्या सुरक्षेबाबत दंडाच्या पावतीचीही धास्ती आहे. वर्ष उलटूनही मेट्रोकडून स्टेशन परिसरात वाहनतळ (पार्किंग) सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवासी मेट्रो स्टेशनखालील पदपथ, रस्त्यांवर वाहने लावून प्रवास करत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी, वाहनचालकांना बसलेला भुर्दंड यामुळे प्रवासी मेट्रोवर नाराज होते. यामुळे अखेर मेट्रोला जाग आली असून, मोरवाडी चौकाजवळ पहिल्या टप्प्याचे पार्किंग सुरू केले आहे.
पिंपरी, मोरवाडी येथील चौकानजीक असलेल्या मेट्रोच्या मोकळ्या जागेवर पार्किंग विकसित करण्यास सुरुवात केली आहे. तेथे पे ॲण्ड पार्कची सुविधा असणार आहे. वाहनचालकांना पार्किंगची सुविधा व्हावी यासाठी ‘सीविक मिरर’ने ती बाजू सविस्तर मांडली होती. यामुळे प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक जागा महामेट्रोस दिल्या आहेत. मात्र, मेट्रो सुरू होऊन अनेक महिने लोटले तरी, अद्याप मेट्रोला पार्किंग सुरू करता आलेले नाही. मेट्रोने प्रवास करणारे नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी मेट्रो स्टेशनखाली वाहने पार्क करून प्रवास करतात. मेट्रो स्टेशनखाली अपुरी जागा असल्याने प्रवासी थेट पदपथ व रस्त्यावर वाहने लावून जातात. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नसतो. तसेच, रस्त्यांवर वाहने लावल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. तसेच, महापालिका व वाहतूक पोलिसांनी मेट्रोकडे नापसंती व्यक्त केली आहे.
प्रवाशांसाठी मेट्रोने तातडीने स्वतंत्र पार्किंगची सुविधा निर्माण करावी, असे महापालिकेने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने हालचाली करीत पिंपरी मोरवाडी चौकाजवळील कमला क्रॉस बिल्डिंगशेजारी पार्किंग विकसित करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. तेथील जमीन समतल करून सीमाभिंत घालण्यात आली आहे. तेथे पे ॲण्ड पार्कची सुविधा असणार आहे. तेथे वाहन लावून प्रवासांना मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जावे लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच तेथे पार्किंगची सुविधा सुरू करण्यात येईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरीप्रमाणेच संत तुकारामगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी येथेही पार्किंगची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत महामेट्रोचे कार्यकारी संचालक तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनीही बैठकीत असल्याचे कारण सांगून बोलण्याचे टाळले.
प्रवाशांच्या रोषानंतर मेट्रोची कार्यवाही
पिंपरी चिंचवड शहरातील लाखो प्रवासी पीसीएमसी ( मोरवाडी) मेट्रो स्थानक येथून प्रवास करतात. प्रवासी वाढल्याने मेट्रोचा गल्ला वाढला. मात्र, पायाभूत सुविधा देण्यास मेट्रोकडून चालढकल होऊ लागली. पार्किंग उपलब्ध नसल्याने वाहने रस्त्यावर येऊ लागली. परिणामी, वाहनचालकांना हजारोचा दंडाची पावती प्राप्त झाली आहे. या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, मेट्रोकडे तक्रारी केल्या. अखेर प्रवाशांच्या या नाराजीनंतर पार्किंगची कार्यवाही सुरू केली.
जुलैमध्ये कारवाईचा वेग वाढला
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच एप्रिलपासून आरटीओ पथकाने स्कूलबसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये परवानगी नसतानाही विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन आढळून आले आहेत. त्यामुळे अशांवर कारवाई सुरू आहे. एप्रिल ते जून महिन्यांत आरटीओच्या पथकाने संशयित अशी ९३ वाहने तपासली आहेत. त्यापैकी ३४ वाहने दोषी आढळून आलेली आहेत. त्यानुसार दंडापोटी त्यांच्याकडून ४ लाख ७३ हजार वसूल केले. जुलै महिन्यात ७२ वाहने तपासली असून, २४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यात ३ लाख ५ हजार दंड ठोठावला.
शहरासह ग्रामीण भागातही आरटीओचे पथक तपासणी करत आहे. नियमांचे उल्लंघन अथवा योग्य कागदपत्रे नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी योग्यता प्रमाणपत्र काढून नियमाचे पालन करावे.
- राहुल जाधव,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड