भोसरीत महेश लांडगे यांची हॅट् ट्रिक
भोसरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांनी तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून येत हॅट् ट्रीक केली आहे. महेश लांडगे ६३ हजार ६३४ मतांनी विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा दणदणीत पराभव केला. लांडगे यांच्या विजयानंतर भोसरी परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्यात आली आहे. लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र मोठा डीजेचा दणदणाट करत जल्लोष केला.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. भोसरी विधानसभा निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या फेरीचा निकाल हातात येण्यास अकरा वाजले. सुरुवातीला मतमोजणी वेग संथ गतीने होता. मात्र, नंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतमोजणी केंद्रावर भेट देऊन पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आव्हान दिले होते. भोसरी विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजणार अशी चर्चा असताना महेश लांडगे यांचा तिस-यांदा विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. तीन वाजेपर्यंत मतमोजणीच्या 23 फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे आघाडीवर होते, तर दुसऱ्या क्रमांकावर अजित गव्हाणे होते. लांडगे यांना २ लाख २१ हजार ५७८ मते मिळाली. त्यांचा ६३ हजार ६३४ मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव झाला. गव्हाणे यांना १ लाख ४८ हजार ०९७ इतकी मते मिळाली आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे अशी लढत झाली होती. भोसरी विधानसभेच्या या आखाड्यात महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना चितपट केलं आहे.
भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटातून शरद पवार गटात अजित गव्हाणे यांनी प्रवेश केला होता. एक महिना अगोदर अजित गव्हाणे यांनी जोरदार प्रचारदेखील सुरू केला होता. मात्र, त्यांचा महेश लांडगे यांच्यासमोर निभाव लागला नाही. अजित गव्हाणे यांनी वारंवार आरोप- प्रत्यारोप केले त्याचा फायदा त्यांना होऊ शकला नाही. अजित गव्हाणेंसाठी शरद पवारही भोसरीच्या मैदानात उतरले तर दुसरीकडे महेश लांडगे यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है” असा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, यांचा प्रभाव भोसरी मतदारसंघावर पडला असून त्याचा फायदा महेश लांडगे यांना झाला आहे.
बालेवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
बालेवाडी येथील राजभवन गेटसमोर दुपारी एक वाजल्यापासून महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जल्लोष केला. महेश लांडगे यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम होती. विजयी घोडदौड सुरू असतानाच दुपारी कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' म्हणत जल्लोष केला. भंडा-याची मुक्त उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
विकासासाठी सोसायट्यांचे पाठबळ
भोसरी निवडणुकीत मागील दहा वर्षांत महेश लांडगे यांनी मोशी, चिखली, च-होलीतील सोसायटीतील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध केल्याने त्यांना सोसायटीचे पाठबळ मिळाल्याचे दिसून आले. परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून लांडगे यांनी लोकांशी जनसंपर्क वाढवून त्यांना छोट्या-छोट्या कामासाठी केलेल्या मदतीमुळे तेथील नागरिकांनी निरंतर विकासासाठी पाठबळ दिल्याचे दिसून आले.