संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा ॲक्शन प्लॅन तयार केला असून, पुढील आठवड्यापासून तालुकानिहाय कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात मुळशी, मावळ, पौड या ठिकाणी कारवाई केल्यानंतर आता पुढील टप्प्यात इतर सात तालुक्यांमध्ये कारवाई करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत आकाशचिन्ह परवाना विभागाने ८ होर्डिंग पाडले आहेत. तर, कारवाईच्या धसक्याने १४ होर्डिंग स्वतः काढून घेतली आहेत. तर, ८२२ अर्ज प्राप्त झाले असून, अर्जांची पडताळणी होऊन परवानगी मिळण्याची अर्जदारांना प्रतीक्षा आहे.
पीएमआरडीए अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील ९ तालुक्यांत हजारो अनधिकृत होर्डिंग आहेत. जून महिन्यात यापैकी जवळपास आठ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. त्यानंतर या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सात तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी कारवाई करणार आहोत. सोमवारपासून (२४ जुलै) या कारवाईला गती मिळणार आहे. दरम्यान, पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार पहिल्या टप्प्यात एक हजारांच्या आसपास अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बोर्ड याची माहिती संकलित केली. मात्र त्यानंतर सर्वेक्षण थांबवले होते. दुसरीकडे अनधिकृत होर्डिंगधारक व चालकांना नोटीस दिली. तसेच मंजुरीबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले. दरम्यान, ठेकेदार नियुक्त करून अनधिकृत होर्डिंग हटवण्यात येत आहेत. यात मुळशी तालुक्यात ५ तर पुरंदर तालुक्यात ३ होर्डिंग अशा एकूण आठ होर्डिंगवर कारवाई झाली. तसेच सात तालुक्यांमधील होर्डिंगधारकांनी त्यांचे अनधिकृत असलेले १४ होर्डिंग स्वत: काढून घेतले. यात भाेर व पुरंदर प्रत्येकी ३, मुळशी, दौंड व शिरूर प्रत्येकी २, हवेली व खेड प्रत्येकी १ होर्डिंग स्वत: होर्डिंगधारकांनी काढले.
अर्जांची होणार पडताळणी
पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंगधारकांना परवानगीबाबत आवाहन केले. त्यानुसार विविध गावातून ८२२ अर्ज परवानगीसाठी प्राप्त झाले. यात मुळशी आणि मावळ तालुक्यातून जास्त अर्ज आले आहेत. दुसरीकडे वारंवार सांगून देखील धोकादायक होर्डिंग काढून न घेतल्याने त्यावरती कारवाई होणार आहे , असे स्पष्ट केले.
चलानमधून ४७ लाखांचे उत्पन्न
होर्डिंगच्या प्रत्येक परवानगी अर्जासाठी चलान घेतले जात आहे. पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील प्रशासकीय इमारतीमध्ये चलान उपलब्ध आहेत. आतापर्यंत ९४० चलान अर्जदारांनी घेतले आहेत. प्रत्येक चलानसाठी पाच हजार रुपये आकारले जात आहेत. विनापरतावा (नाॅन रिफंडेबल) असलेल्या या चलानच्या रकमेतून पीएमआरडीएला आतापर्यंत ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
अनधिकृत होर्डिंगवर कारवाईबाबत आराखडा तयार आहे. परवानगीसाठी अर्ज प्राप्त होर्डिंगला पहिल्या टप्प्यात वगळण्यात येत आहे. जून महिन्यात काही होर्डिंगवर कारवाई केली आहे. या महिन्यात देखील कारवाई करण्यात येत आहे.
- सुनील मरळे,
महानगर नियोजनकार, विकास परवाना विभाग, पीएमआरडीए