संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर आहे. त्यातही चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एक विकसित मतदारसंघ आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली चिंचवड मतदारसंघाने विकासाचा नवा मापदंड तयार केला आहे. त्यामुळे देशभरातून शहरात आलेल्या नागरिकांचा सर्वाधिक कल हा चिंचवड मतदारसंघाकडेच राहिला. परिणामी या वाढत्या लोकसंख्येचा ताण येथील मूलभूत सुविधा व विकास प्रक्रियेवर पडला. या पार्श्वभूमीवर भविष्यातील चिंचवड मतदारसंघापुढील नवी आव्हाने लक्षात घेऊन मतदारसंघाचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याचे मिशन हाती घेतले आहे. येणाऱ्या काळात चिंचवडला देशातील सर्वोत्तम मतदारसंघ करण्याचे मिशन हाती घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात असल्याची भावना महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केली.
मतदारसंघात प्रचार करताना जाणवत असलेल्या प्रश्नांबाबत बोलताना जगताप म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व प्रदूषण या तीन समस्या आमच्यासमोर आहेत. मात्र या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आम्ही पाऊले उचलली आहेत. वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मेट्रो, रिंगरोड, एलिव्हेटेड रोड यांचे जाळे उभरण्यात येणार आहेत. सध्या हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच 'रिंगरोड प्रकल्प' ही कार्यरत आहे. त्याचबरोबर नदीसुधार प्रकल्पांतर्गत 'जल वाहतुकी'च्या पर्यायावरही काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच हा मतदारसंघ वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळाले आहे, तर भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी लवकरच मिळणार आहे. त्याचे भूमिपूजनही झाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व सोसायट्यांमध्ये 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' व 'रिसायकलिंग' प्रक्रिया राबवून पावसाळ्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून तो पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होऊन पाण्याची बचत होणार असल्याचेही जगताप म्हणाले.
निवडून आल्यावर प्राधान्याने कराव्या लागणाऱ्या कामांची माहितीही शंकर जगताप यांनी सविस्तरपणे दिली. नदीसुधार प्रकल्प आणि वॉटर ट्रान्सपोर्टबद्दल सांगताना जगताप म्हणाले की, साबरमतीच्या धर्तीवर सुरू असलेल्या मुळा व पवना नदी सुधार प्रकल्प पूर्ण करून जलवाहतुकीचा (वॉटर ट्रान्सपोर्ट ) अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणणार आहोत. रावेत बंधाऱ्याच्या धर्तीवर नदीच्या किनारी पर्यटनस्थळ (टूरिझम पॉइंट) उभारणार असून संपूर्ण नदीघाट विकसित करणार आहोत. पीएमपीएमएल इलेक्ट्रिक व एसी बसच्या फेऱ्या वाढवताना किवळे येथील मुकाई चौकातील बस टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकावर सक्षम आणि वाजवी दरातील पार्किंग व्यवस्था उभारणार आहोत. बस व मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी ई-बाईक, ई-रिक्षा, ई-सायकल असे पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. महिला सुरक्षिततेवर भर देण्यात येणार असल्याचे सांगत जगताप म्हणाले की, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ए.आय आणि ऑटोमेशनच्या साह्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी 'थर्ड आय' ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याखेरीज सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच होतात आरोप, मतदार सुज्ञ
स्वतः काय केले हे न सांगता येणाऱ्यांकडूनच राजकारणात आरोप केले जातात. पाच वर्षांत प्रभागाचा विकास करू न शकणारा विधानसभा निवडणूक आली की आमदार होण्याची स्वप्न पाहतो आणि आरोप करत सुटतो, पण नागरिक सुज्ञ आहेत. घराणेशाहीचा विचार करायचा झाल्यास ज्या कुटुंबामध्ये गेल्या ४० वर्षांपासून नगरसेवकपद आहे त्यांना स्वतःच्या प्रभागाचा विकास करता आलेला नाही. गाव ते शहर अशी ओळख निर्माण करण्यात कोणाचा वाटा आहे, हे सुज्ञ मतदार जाणतात. त्यामुळे या मतदारांनी आम्हाला आत्तापर्यंत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. लोकसंख्या आणि नागरिकीकरण वाढत असल्याने समस्या सोडवण्यास वेळ लागत आहे. मात्र समस्या सोडवण्यांबरोबरच चिंचवड विधानसभा मतदारसंघाबरोबरच शहराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आम्ही आरोप करत नाही तर विकास करतो, असेही शंकर जगताप म्हणाले आहेत.
पायाभूत सुविधांच्या विकासावर देणार भर
जिल्हा रुग्णालय, पुणे औंधच्या वैद्यकीय दर्जात वाढ करणार असून जिजामाता व तालेरा रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय सुविधा देण्याची व्यवस्था करणार असल्याचे जगताप म्हणाले. चाइल्ड स्पेशालिस्ट हॉस्पिटल व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार, थेरगाव येथे मनपाच्या साह्याने कॅन्सर हॉस्पिटल उभारून रुग्णांना कमी दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकता विकास केंद्राची निर्मिती करताना असंघटित क्षेत्रातील कामगारांना कौशल्य आधारित व्यवसायाची संधी मिळण्याकरिता लेबर मॅनेजमेंट यंत्रणेद्वारे मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. बांधकाम कामगारांकरिता लेबर हब उपलब्ध करणार. यातून मजूर बांधवांना हक्काची जागा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या शहरासाठी पवना धरणातून व आंद्रा भामा आसखेड धरणातून असा एकूण ६६० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. २०५० पर्यंतची शहराची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून प्रस्तावित १६७ एमएलडी पाणीसाठ्याचे नियोजन करून मुळशी धरणातूनही अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्याची मागणी करणार, मलशुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) संख्या वाढवून ५० टक्के पाणी रिसायकल करण्यात येणार आहे.
भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता पाण्याचा पुनर्वापर (रिसायकल) करण्यासाठी एसटीपीची संख्या वाढवणार व सोसायट्यांसाठी रियूज वॉटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असे जगताप म्हणाले. विजेची वाढती गरज लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जेचे (सोलार एनर्जी) प्लॅन्ट उभारण्यात येणार आहेत. सोसायट्यांमध्ये विजेची बचत करण्यासाठी सोलार पॅनेल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, सौर विजेचे दिवे बसवण्यात येणार आहेत. शहराला 'स्पोर्ट्स सिटी' अशी नवी ओळख निर्माण करून देताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्ती केंद्राची उभारणी करणार आहोत. पीसीएमसी फेस्टिवलला व्यापक स्वरूप देण्याबरोबरच सांगवी, मामुर्डीमध्ये खेळांकरिता बहुउद्देशीय क्रीडांगण व चिंचवडमध्ये योगभवन, बास्केटबॉल व तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे जगताप म्हणाले. शहराची वाढती गरज लक्षात घेता निगडी ते देहूरोड, हिंजवडी ते चाकण आणि देहूरोड ते वाकड या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या कामाला गती देऊन पूर्णत्वास नेणार व शहर वाहतूक कोंडीमुक्त करणार, याची ग्वाही शंकर जगताप यांनी दिली. पिंपरी-चिंचवड येथे देशी पिंपळ, चिंच, कडुलिंब व वड अशा झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेऊन दत्तक योजना राबवणार आहे. इको टूरिझम ऑक्सिजन पार्क उभारणार, शहराकरिता भूषण ठरणाऱ्या किवळे येथे सुरू असलेल्या भारतरत्न गार्डनचे काम पूर्णत्वास नेणार व थेरगाव बोट क्लब कैजुदेवी उद्यान सुशोभीकरण करून दर्जात वाढ करणार आहे. पीडब्लूडी मैदानात बहुउद्देशीय खेळांचे क्रीडांगण विकसित करणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
प्रगत शिक्षणप्रणालीचा ध्यास
अटल डिजिटल स्कूलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ई लर्निंग, ई कोर्सेस, डिजिटल क्लासरूममध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या व आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या धर्तीवर प्रगत शिक्षण प्रणाली राबविणार असल्याचे सांगताना जगताप यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे शिक्षण व ज्ञान मिळण्यासाठी अॅस्ट्रोनॉमी लॅब विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित विकास प्रयोगशाळा उभारणार असल्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला आहे. सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील लोकनेते लक्ष्मण जगताप अभ्यासिका व पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ अभ्यासिकेच्या धर्तीवर मतदारसंघातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसोबतच महिला सक्षमीकरणाबाबत आपली भूमिका मांडताना जगताप यांनी, महिला बचत गटामार्फत महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. महिला बचत गट बहुउद्देशीय सभागृह बांधणार व बचत गटाच्या महिला भगिनींना स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक साहाय्यता उपलब्ध करण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.