संग्रहित छायाचित्र
श्रमिकांचे, कामगारांचे आणि उद्योगांचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड देशभरात प्रसिद्ध आहे. औद्योगिक नगरी,आयटीसीटी ते मेट्रोसिटी अशा वेगवेगळ्या टप्प्यातून या शहराने प्रवास केला आहे. किंबहुना, हाताला काम देणारे किंवा श्रमाला मूल्य देणारे शहर अशीच या शहराची प्रमुख ओळख आहे. देशाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या शहरांमध्येही पिंपरी-चिंचवड अग्रेसर मानले जाते. या शहरातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याचा संकल्प महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड अथवा भोसरी एमआयडीसीने शहरातील लोकांना रोजगार दिलाच. त्याचबरोबर राज्यातील आणि देशातील लोकांनाही हक्काचे काम मिळून दिले. मागच्या काही वर्षांमध्ये येथील उद्योग जगतामध्ये काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. कंत्राटीकरण, श्रमाचे अवमूल्यन यांसारख्या घटकांमुळे कामगार नाडला जात आहे. तर उद्योजक, कर्नाटकात लघुउद्योजकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे बघता कामगार आणि उद्योजक या दोन्ही घटकांना पुढे नेण्यासाठी भविष्यात अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. भोसरी एमआयडीसीचा त्यादृष्टीने नक्कीच पुढचे पाऊल टाकेल.
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडलाही इतिहासाचा वारसा लाभला आहे. इंद्रायणी, पवना यांसारखा पवित्र नद्यांनी ही भूमी समृद्ध केली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे देहू आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अलंकापुरीच्या छत्रछायेत राहातच या शहराने सर्वधर्मसमभावाचा संस्काराने विचार जपला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून या महानगराने, येथील लोकांनी कायम प्रेरणा घेतली आहे. म्हणूनच भक्ती आणि शक्तीचा संगम इथे पाहायला मिळतो. महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. तसेच क्रांतिवीर चापेकरांच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्याची देखील ही भूमी साक्षीदार आहे. अशा या शहराच्या प्राचीनतेच्या पाऊलखुणा अजूनही ठायीठायी सापडतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध असलेल्या राजा भोजांच्या राजधानीचे हे शहर आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे भोसरी. भोसरीचे खरे नाव भोजापुरी वा भोजापूर. भोजापुरी ही राजा भोज यांची राजधानी. भोजापुरी या नावाचा अपभ्रंश भोसावरी व त्यानंतर भोसरी असा झाल्याचे सांगण्यात येते. म्हणून या गावाला भोसरी म्हणून ओळखले जाते. भोसरीच्या मोकळ्या रानात एक मातीचे मडके व काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी २०० ते २८० च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. यावरून हे शहर पुरातन असल्याचे अनेक पुरावे आढळतात. विशेष म्हणजे भोसरीची पैलवानांची, मल्लांची भूमी म्हणूनही भोसरीची ख्याती आहे. या मातीमधून आजही कुस्तीचा, कुस्तीप्रेमाचा गंध दरवळतो. अशा शहराला, नगराला नवी दिशा मिळाली, ती औद्योगिक क्रांतीनंतर.
१९६० च्या दशकात पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक क्रांतीची बीजे रोवली गेली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून पिंपरी- चिंचवडमध्ये औद्योगीकरणाला चालना मिळाली. पिंपरी-चिंचवड विशेषतः भोसरी पट्ट्यात अनेक कारखाने उभे राहिले. टाटा मोटर्स, बजाज, कायनॅटिक, महिंद्रा यांसारख्या कंपन्यांनी येथील अर्थकारणाला गती दिली. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. सुरुवातीला हा भाग राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीमध्ये मोडत असे. या भागाचे नेतृत्व करताना शरद पवार यांनी येथील ऑटोमोबाईल उद्योगाला जगाच्या नकाशावर नेण्याचे काम केले.
उद्योग धंद्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतरच्या काळात पवारांच्या पुढाकारातूनच हिंजवडी परिसरात आयटी उद्योग उभा राहिला. या आयटी उद्योगाने हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे दिसून येते. याशिवाय तळवडे परिसरातही आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात आल्या असून, आगामी काळात चऱ्होली परिसरापर्यंत आयटीचे जाळे विस्तारणार आहे. पवार साहेबांच्या दूरदृष्टीचेच हे गमक म्हणता येईल. सुरुवातीला भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि निगडी अशा चार शहरांची मिळून नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने शहराचा विस्तार होत गेला. शहर चोहोबाजूंनी वाढले. माजी मंत्री रामकृष्ण मोरे, अजितदादा पवार यांनी या शहराचे नेतृत्व करताना शहर विकासावर भर दिला. त्यामुळे शहराला स्वतंत्र ओळख मिळाली, चेहरा मिळाला.
नाशिक फाटा उड्डाणपूल; विकासाचा राजमार्ग
स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मलाही काम करण्याची संधी मिळाली. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, उद्याने उभी राहिली. नाशिक फाटा दुमजली उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यांसारख्या प्रकल्पांनी शहराच्या लौकिकात भर घातली. यामुळे प्रवाशांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
भोसरी, चाकणपर्यंत मेट्रोचा संकल्प
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रोमुळेही शहरवासीयांचा प्रवास सुखकर बनल्याचे दिसून येते. शहराची वाढती गरज लक्षात घेता मेट्रोचे जाळे नाशिक फाट्यापासून भोसरी, चाकणपर्यंत विस्तारावे लागणार आहे. त्याचबरोबर भोसरी एमआयडीसीतील कामगारांच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही आगामी काळात विचार करावा लागेल. पुढच्या काळात माझा या कामांवर फोकस असेल.
नियोजनबद्ध विकासावर भर
मागच्या काही वर्षांत सर्वच शहरांचा अनिर्बंध विकास झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंग हे प्रश्न जटिल बनले आहेत. पार्किंगच्या नावाखाली काही मंडळींकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे पाहायला मिळते. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शहराचा नियोजनबद्ध, सूत्रबद्ध विकास करणे, ही काळाची गरज ठरते.