पावसाचा पुणे-मुंबई रेल्वेसह एसटीला फटका

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणारी रेल्वे सेवा मंगळवारी सकाळपर्यंत विस्कळीत झाली होती. लोकलसह अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तर कोकण मार्गावरील एसटीच्याही काही फेऱ्या या थांबवण्यात आल्या असून, पणजी मार्गावर गेलेली एसटीची फेरी अडकून पडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Pankaj Khole
  • Edited By Admin
  • Wed, 10 Jul 2024
  • 11:54 am
pimpri chinchwad news, pune to mumbai, disrupted, express train, heavy rain, waterlogging

पावसाचा पुणे-मुंबई रेल्वेसह एसटीला फटका

नोकरदारांचे हाल, वाहतूक सेवा झाल्या विस्कळीत, पणजी मार्गावर गेलेली एसटी रस्त्यातच अडकली

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणारी रेल्वे सेवा मंगळवारी सकाळपर्यंत विस्कळीत झाली होती. लोकलसह अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तर कोकण मार्गावरील एसटीच्याही काही फेऱ्या या थांबवण्यात आल्या असून, पणजी मार्गावर गेलेली एसटीची फेरी अडकून पडली आहे. पर्यायाने ती आगारात पुन्हा आणण्यासाठी दुसरा मार्ग निवडावा लागला. दरम्यान, मंगळवारी सकाळनंतर रेल्वेचे काही मार्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे, पावसाचा अंदाज लक्षात घेता अनेक खासगी वाहनचालकांनीही कोकण आणि मुंबईचा मार्ग टाळला.

पावसाचा फटका पुणे-मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस (११०१०), डेक्कन एक्स्प्रेस (११००८), डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (१२१२४), इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८) सोमवारी रद्द करण्यात आली. मुंबईतील काही मार्गांवर पाणी साचल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पाऊस ओसरल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा काही मार्ग सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून दररोज हजारो नोकरदार पुणे-मुंबई-पुणे प्रवास करतात.

त्यामुळे ऐनवेळी रेल्वे मार्ग बंद केल्याने त्यांची धावपळ उडाली होती. पावसामुळे  रेल्वे प्रशासनाने सोमवारी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द केल्याची घोषणा केली. त्याचा फटका मंगळवारी देखील बसला. नेमका रेल्वे मार्ग सुरू आहे की नाही याची माहिती नसल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवली. आठवड्यातील पहिल्याच दिवशी रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे रद्द झाल्यामुळे अनेकांनी पर्यायी रस्ते मार्गाने प्रवास करणे पसंत केले. विद्यार्थ्यांनाही यामुळे फटका बसला.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी एक असलेल्या एसटी महामंडळानेही काही मार्ग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला. कोकण मार्गावर पावसाचा इशारा देण्यात आल्याने तेथे सोडण्यात आलेल्या गाड्या उशिराने धावत होत्या. तसेच, वल्लभनगर आगारातून पणजी मार्गावर गेलेली एसटीची फेरी रस्त्यात अडकून पडली. घाट मार्गावर पावसामुळे रस्त्यावर अडसर निर्माण झाले . त्यामुळे अर्ध्या वाटेतूनच ती फेरी पुन्हा बोलावण्यात आली. पावसामुळे पणजी मार्गातील अनेक रस्ते बंद असल्याने पर्यायी मार्गाने एसटी वळवावी लागली.

पावसामुळे प्रवाशांची पाठ
पावसाळा आणि पुणे, सातारा, रत्नागिरी तसेच रायगड या जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता. परिणामी, या मार्गावर एसटीच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रवाशांनी देखील या ठिकाणी जाण्याचे टाळले. अनेकांनी रेल्वे अथवा एसटी या प्रवासी वाहतूक सोडून इतर खासगी वाहनांचा वापर केला.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest