पिंपरी-चिंचवड: शहरातील उपनगरात पीएमपी विस्तारणार का ?

दिघी- आळंदी, चाकण फाटा- मोशी टोलनाका, देहू- आळंदी, चिखली रोड या मार्गांवरील बस सुविधा वाढवण्याबाबत रुट सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या पट्ट्यात आणखी बसच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार आहे.

Pimpri Chinchwad, PMPML, Alandi, Dighi, Moshi, Chikhali

संग्रहित छायाचित्र

दिघी, आळंदी, मोशी, चिखली मार्गांचे सर्वेक्षण, बसच्या अपुऱ्या संख्येने खासगी वाहनांचा वापर वाढला

दिघी- आळंदी, चाकण फाटा- मोशी टोलनाका, देहू- आळंदी, चिखली रोड या मार्गांवरील बस सुविधा वाढवण्याबाबत रुट सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या पट्ट्यात आणखी बसच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार आहे.  तसेच, चऱ्होली परिसरात पंतप्रधान आवास योजना प्रकल्पमार्गे प्राइड सोसायटी व तनिष्क पार्क अशा दोन मार्गांवर पाहणी करून या मार्गावर बस सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तूर्तास, या मार्गावर बस सेवा कमी असल्याने नागरिक खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. दुसरीकडे, नवीन बसची प्रतीक्षा असल्याने या बसेस ताफ्यात आल्यास हा मार्ग सुरू होईल, असे पीएमपीएमएलएने स्पष्ट केले

चऱ्होली परिसरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा सक्षम करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती.  पीएमपीएमएल वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, सर्व डेपो मॅनेजर उपस्थित होते. तसेच, बैठकीनंतर तत्काळ स्थळ पाहणी करण्यात आली. आगार व्यवस्थापक विजयकुमार मदगे, भास्कर दहातोंडे, अनिकेत गायकवाड, संदेश बडिगर उपस्थित होते. तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राइड वर्ल्ड सिटी सोसायटी चोली या ठिकाणाहून महिला, विद्यार्थी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवास करीत आहेत; मात्र या सध्या या ठिकाणी बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, या ठिकाणी उपलब्ध मार्गात अगदीच बसेस कमी असल्याने परिसरातील नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी बसेसच्या मार्गांमध्ये बदल करून ते पुढे दिघी, चऱ्होलीपर्यंत वाढवण्यात आले आहेत. सद्यस्थितीत बसेस उपलब्ध नसल्याने या मार्गावर नवीन फेऱ्या वाढवण्याबाबत अडचण निर्माण होत आहे. भविष्यात प्रवासी संख्या वाढण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आणखी मार्ग वाढवण्याचा विचार आहे.

भविष्यात हा परिसर शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा या ठिकाणी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बस सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पायाभूत सोयी-सुविधा आणि विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारल्यामुळे या भागात चिखली-मोशी-चोली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा त्या तुलनेत उपलब्ध करणे काळाची गरज आहे.

या मार्गांवरही बससेवा वाढवावी

पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकापासून पुढे असलेल्या हिंजवडी, मारुंजी त्याचप्रमाणे वाकड रस्त्यावर देखील आणखी बस वाढवाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. सकाळी सात ते दहा या वेळेत डांगे चौकापासून पुढे मार्गस्थ होणाऱ्या विविध बसला तुफान गर्दी असते. जागा मिळत नसल्याने प्रवासी अक्षरशः लटकून प्रवास करतात. हाच प्रकार किवळे-रावेत या मार्गावर देखील दिसून येतो.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story