संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: वल्लभनगर आगाराच्या मालवाहतूकीसाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने ऑर्डर रद्द झाल्या असून, केवळ एका महिन्यात म्हणजेच जूनमध्ये मालवाहतूक बस उपलब्ध नसल्याने १२ पेक्षा अधिक ऑर्डर घेता आल्या नाहीत. यामुळे महामंडळाला तब्बल दहा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
एसटी महामंडळाने राज्यभरात मालवाहतूक सुरू केली होती. वल्लभनगर आगारात देखील तीन मालवाहतूक बसची सुविधा देण्यात आली होती. प्रवासी गाड्यांमध्ये अंशतः बदल करून 'महाकार्गो' नावाने मालवाहतूक सेवा सुरू होती. या माध्यमातून कोट्यावधी रुपये एसटी प्रशासनाला मिळत होते. मात्र, वाहने भंगारात निघाल्याने तर काही वाहनांची मर्यादा ओलांडल्याने ते या सेवेतून बाद झाले. परिणामी, मालवाहतुकीसाठी गाड्यांचा तुटवडा जाणवत असून, सध्या एका वाहनावरच ही सेवा सुरू आहे. नामांकित कंपन्यांची दोन कामे सोडल्यास इतर कामे मिळत नाही. तर, वेळेवरती वाहन असल्याने ऑर्डर रद्द केल्या जात आहेत.
पुणे विभागात मालवाहतुकीसाठी ७८ पैकी केवळ ४१ वाहने शिल्लक आहेत. तर, पिंपरी-चिंचवड आगाराला एकच वाहन आहे. याबाबत प्रशासनाला अनेकदा कळवून देखील वाहने मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. यंदाच्या वर्षी मालवाहतूकीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदाच्या वर्षी मोठी हानी झाली आहे. दिवसाच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. स्वस्त आणि सुरक्षित सेवेमुळे नागरिकांची मालवाहतुकीला मागणी असूनही मालवाहतूकीसाठी बांधण्यात आलेल्या बस उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना माघारी जावे लागत आहे. एसटीचे दरवर्षी कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे
पिंपरी-आगाराला इलेक्ट्रिक वाहनाची प्रतीक्षा
पुण्यातील पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यात सीएनजी बस सुरुवात केली आहे. त्याचे मार्ग आणि फेऱ्या या मर्यादित असल्याने सीएनजी पुरु शकते. मात्र,पिंपरी-चिंचवड आगारातून बाहेर पडणाऱ्या बस या लांब पल्ल्याच्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सीएनजीचा वापर केला जाऊ शकत नाही. परिणामी, इंधनावरती लाखो रुपयांचा खर्च होत आहे. पिंपरी-चिंचवड आगाराला येत्या काळात एसटीची इलेक्ट्रिक बस मिळणार आहे. शहरात त्यासाठी स्वतंत्र जागा देखील पाहण्याचे काम सुरू आहे.
यंदाच्या वर्षीचे उत्पन्न
जानेवारी - ७४ हजार ९००
फेब्रृवारी - ७१ हजार २१०
मार्च - ५ हजार ८००
एप्रिल - ८९ हजार ८६०
मे - ९७ हजार ४३९
एकुण - ३ लाख ३९ हजार २०९
मालवाहतूक बसची संख्या घटत आहे. नवीन बस मिळण्याबाबत आगारामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यामध्ये दररोज ५ ते ७ बसची आवश्यकता आहे.
-अशोक आघाव, सहायक वाहतूक अधीक्षक, पुणे