पिंपरी-चिंचवड: आरटीओकडून अनफिट स्कूलबसवर कारवाई होणार

पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) थकलेल्या फिटनेस प्रमाणपत्राबाबत स्कूल बसचालकांना नोटीस दिल्या होत्या. मात्र अद्यापी, अनेक स्कूल बसचालकांनी तपासणी करून घेतली नाही. त्यामुळे अखेर अशा वाहनांवर कारवाई सुरू केली असून, प्रत्येक बस चालकाने राज्य शासनाने जारी केलेल्या २०११ मधील बस नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे आरटीओने स्पष्ट केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Pankaj Khole
  • Edited By Admin
  • Tue, 2 Jul 2024
  • 11:32 am
pimpri chinchwad, unfit school buses, vehicle fitness rule, RTO, PCMC

आरटीओकडून अनफिट स्कूलबसवर कारवाई होणार

वाहन चालवताना मोबाईल वापरणे बंद, परवाना व बिल्ला तपासणार; शहरातील ३ हजार बसवर ठेवणार वॉच

पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) थकलेल्या फिटनेस प्रमाणपत्राबाबत स्कूल बसचालकांना नोटीस दिल्या होत्या. मात्र अद्यापी, अनेक स्कूल बसचालकांनी तपासणी करून घेतली नाही. त्यामुळे अखेर अशा वाहनांवर कारवाई सुरू केली असून, प्रत्येक बस चालकाने राज्य शासनाने जारी केलेल्या २०११ मधील बस नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे आरटीओने स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहरात २९५१ स्कूलबसची आरटीओत नोंद आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पर्यंत यातील जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाहनांनी तपासणी केली आहे. मात्र अद्यापी २५ टक्के अनफिट वाहने रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने त्यावर देखरेख ठेवण्याचे काम आरटीओच्या वतीने करण्यात येत आहे. फिटनेस नसताना स्कूल बस रस्त्यांवर दिसल्यास त्या चालकावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसमधून नेत असतात. आसन क्षमतेपेक्षा अधिक मुलांना बसवून दाटीवाटीतून ने-आण करणाऱ्या चालकांना दंड करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. मुले ज्या वाहनांतून शाळेत ये-जा करतात. त्या वाहनांकडून नियमावलीचे पालन होते की नाही याची माहिती प्रत्येक शाळेतील स्कूल बस कमिटी व पालकांना असणे गरजेचे आहे. शासनाने जारी केलेल्या २०११ मधील स्कूलबस नियमावलीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. स्कूलबस चालकांनी वाहन चालवताना मोबाईल वापरू नये. विद्यार्थ्यांनी खिडकी अथवा दरवाजातून डोके-हात बाहेर काढू नये. प्रत्येक स्कूलबससाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आरटीओ अधिकारी सांगतात.

दरम्यान, स्कूलबस चालकांना नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे. दुसरीकडे, अनफिट स्कूलवर आरटीओचे वायुवेग पथक नजर ठेवून आहेत. तपासणी केली नसल्यास अथवा नियम भंग केलेले आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळेत विद्यार्थी ये-जा करणाऱ्या आणखीन काही स्कूल व्हॅन देखील आहेत. त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

... हे आहेत नियम

रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक स्कूलबसमध्ये प्रथमोपचार साहित्य व औषधे उपलब्ध असावीत.अधिकृत संस्थेने प्रमाणित केलेले ५ किलोग्रॅम वजनाचे दोन अग्निशमन यंत्रे , खिडक्यांना तीन आडव्या दांड्या असाव्यात. बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी,  वाहनचालक प्रशिक्षित असावा, बसमध्ये एक पुरुष, एक महिला परिचर असावी. विद्यार्थी बसमध्ये चढ-उतार करताना त्यांच्या सुरक्षिततेकडे त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. वाहतुकीचा परवाना, बिल्ला सोबत ठेवावा, स्कूल बसची यांत्रिक स्थिती उत्तम ठेवावी, वाहतुकीचे तसेच आरटीओच्या  नियमांचे पालन करावे,  स्कूलबस नोंदणीपासून १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी, रस्त्यामध्ये अथवा सिग्नलला वाहन उभे करू नये.

ग्रामीण भागातील शालेय बसच्या पाहणीसाठी विशेष मोहीम

पिंपरी-चिंचवडप्रमाणेच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात स्कूलबस धावतात. मात्र, हे बसचालक नियम पाळत नाहीत, अशा काही तक्रारी आरटीओ कार्यालयात प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात म्हणजेच खेड, जुन्नर, आंबेगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरात स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार ग्रामीण भागात देखील स्कूलबस चालकांना आवाहन करण्यात येणार आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest