संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता १०० टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पास आणि खासगी शाळेतील ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवासी पासेस वितरण योजना सुरू करण्यात येत आहे.
पाससाठी शनिवारपासून अर्जाचे वाटप केले जाणार आहे. निगडी, भोसरी, पिंपरी (नेहरुनगर) आगार व पिंपरी मुख्यालय क्रमांक २ (लोखंडे भवन) व सर्व पास केंद्रांवर अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, दरवर्षी अंदाजे सोळा हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे पास वितरित केले जातात. त्या विद्यार्थ्यांनी केंद्रावरून पास नेणे अनिवार्य आहे. दरम्यान या योजनेसाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाने पुढाकार घेणे आवश्यक असून, पालकांनी त्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही.
अर्ज महामंडळाच्या वरील आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे शाळेतील विद्यार्थ्यांकरीताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारामधून एकत्रितरित्या घेऊन जाऊ शकतात. तसेच, अर्ज भरून एकत्रितरित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही. याकरीता जे विद्यार्थी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहतात व हद्दीतील शाळेत शिक्षण घेतात, अशाच ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बस पास सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाच्या आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पास रकमेच्या २५ टक्के रकमेनुसारचे चलन तयार करून देण्यात येईल. ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेमध्ये भरणा केलेनंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच, सदर पासकरीता अर्ज वितरण शनिवारपासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरू होणार आहे.
या योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या निगडी, भोसरी, पिंपरी (नेहरुनगर) आगार व पिंपरी मुख्यालय क्र. २ (लोखंडे भवन) येथे उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील व पालिका हद्दीतील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२४५४५४५४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.