पिंपरी-चिंचवड : सेतू कार्यालयाला बजावली नोटीस
पिंपरी-चिंचवड: विविध दाखल्यांसाठी आणि सरकारी योजनेच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिक सेतू कार्यालयात मोठ्या संख्येने येत असतात. दरम्यान, दाखल्यांचा घोळ, वारंवार बंद पडणारे सर्व्हर आणि कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा यामुळे अर्जदारांना अडचणी निर्माण होतात. तहसील कार्यालयातील नागरिकांना करावी लागणारी कसरत 'सीविक मिरर'ने 'तहसील कार्यालयात अर्जदारांची मोठी गर्दी' या मथळ्याखाली मांडली होती. याची तात्काळ दाखल घेत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाने सेतू कार्यालय चालकाला नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अडवणूक अथवा दिरंगाई केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे या योजने संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
राज्य सरकारने या योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रति महिना दीड हजार रुपयांची घोषणा केली आहे. त्यासंबंधी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग नागरी सुविधा केंद्र तसेच निगडीतील सेतू कार्यालयात येत आहेत. शहरातील विविध नागरी सुविधा केंद्रात रांगा लागत आहेत. या योजनेमुळे दाखले तसेच त्या संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची संख्या वाढली आहे. मात्र, निगडीतील सेतू कार्यालयाकडून संबंधित योजना आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे वेळेवर दिले जात नसल्याची तक्रारी प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे, शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठी आवश्यक दाखले देखील पालकांना मिळत नाहीत. येथील कार्यालयाच्या तांत्रिक घोळामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्याचप्रमाणे येथील कर्मचारी नागरिकांशी व्यवस्थित बोलत नसल्याच्या तक्रारी देखील आल्या आहेत.
दरम्यान, निगडी येथील सेतू कार्यालयातील प्रिंटर बंद पडल्याने नागरिकांची हाल झाले होते. त्यातच निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दाखलांबाबत व्यवस्थित माहीत नसल्याचे दिसून आले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित सेतू कार्यालय चालकास तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना विविध दाखले आणि योजना संबंधित सहकार्य करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
केंद्र चालवणे बनली डोकेदुखी
निगडी येथील सेतू कार्यालय चालवणे संबंधित ठेकेदाराला डोकेदुखी बनली आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे येथील चालकाने सांगितले. त्याचप्रमाणे प्रशिक्षित स्टाफचा अभाव आणि दाखल्यांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गर्दी याचा समन्वय साधता येत नसल्याने अर्जदारांची मोठी कुचंबणा होत आहे.