मेट्रोला पडला सुशोभीकरण पुनर्स्थापनेचा विसर
पुणे मेट्रोअंतर्गत पीसीएमसी स्थानक ते दिवाणी न्यायालय (पुणे) हा मार्ग सुरू आहे. मात्र, या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी ते हॅरिस ब्रिज, दापोडी दरम्यान अडसर ठरणारे घटक काढून टाकण्यात आले होते. मात्र मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर सुशोभीकरणाचे पुनर्स्थापना करण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता मेट्रोचे काम गतवर्षीच पूर्ण झालेले असून, २०२३ च्या पावसाळ्यात सुशोभीकरणाची रचना पूर्ववत करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक होते. मात्र, वर्ष उलटून देखील त्याची दखल मेट्रोने घेतली नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व महामेट्रो दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे सुशोभीकरण पुनर्स्थापन व वृक्षारोपण ही कामे अद्यापही प्रलंबित असल्याचे दिसून आले. शहराचा विकास होत असताना, दुसरीकडे अशाप्रकारे गलथान कारभार दिसून येत आहे. पिंपरी ते दापोडी या मेट्रोच्या कामादरम्यान झाडांचा विस्तार कमी करणे, पुनर्रोपण करणे, पूर्ण काढणे, त्याचप्रमाणे सुशोभीकरण करणे आदी कामे होती. दरम्यान काम झाल्यानंतर सुशोभीकरण नव्याने करणे आवश्यक आहे. तसेच, झाड काढल्याबाबत प्रतिवृक्ष १० झाडे रोपण करणे, बाधित वृक्षांपैकी पुनर्रोपित झाडांची देखरेख करणे आणि सुशोभीकरण नव्याने करणे अशी मागणी करण्यात आली होती.सद्यस्थितीमध्ये हा परिसर अतिशय बकाल दिसत आहे. प्रत्यक्षात पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम अपेक्षित होते. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मेट्रो यांचा समन्वय नसल्याने हे काम लांबणीवर पडलेले असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, पुणे महापालिकेच्या हद्दीत मेट्रोकडून कामाच्या वेळी सुशोभीकरण अथवा झाडे तोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही सर्व कामे त्यांनी वेळेत पूर्ण केली. पण, पिंपरी-चिंचवड शहराचे हद्दीत हे काम पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो वेगाने धावू लागली आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्नही वाढले आहे. मात्र, मेट्रोकडून या कामाकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, दीड वर्ष उलटूनही कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महामेट्रोचे महाव्यवस्थापक असलेले श्रावण हर्डीकर हे पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते. तरीसुद्धा शहरासाठी तळमळ या अधिकाऱ्याकडून दिसून येत नाही.
मेट्रोकडे उपलब्ध नाही कामाची माहिती
मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर सुशोभीकरण करणे बंधनकारक असूनही ते करण्यात मेट्रोकडून विलंब होत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी माहिती अधिकारात सुशोभीकरण कामाची माहिती मागवली होती. मात्र, मेट्रोकडे या कामाच्या आदेशाची प्रत उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे कामाच्या तपशिलाबाबत कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती वाडकर यांना दिली. त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी देखील महापालिका आणि मेट्रो प्रशासनाला वाडकर यांनी केली आहे.
या कामाबाबत निविदा काढण्यात आली आहे. ही जागा महापालिकेची असल्याने त्याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र, या प्रश्नावर नुकतीच बैठक झाली आहे. मेट्रोकडून ते काम पूर्ण होणार आहे.
- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो