तहसील कार्यालयात अर्जदारांची मोठी गर्दी
विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासह विविध दाखले आणि शासकीय योजनेसाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे तहसील कार्यालयात उभे राहायलाही जागा मिळत नाही. पालखी सोहळा आणि सुट्टीनंतर आवश्यक दाखले मिळवण्यासाठी पालकांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र, सर्व डाऊन आणि धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना तासनतास थांबावे लागले.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे सरकारी योजनेचा लाभ आणि पोलीस भरतीसारख्या कामासाठी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी नागरिक या ठिकाणी आले होते. गेल्यात दोन दिवसांत संत तुकोबांची पालखी शहरात होती. त्यामुळे देहू पासून ते पिंपरी-चिंचवड या पालखी सोहळ्याचे नियोजन तहसील कार्यालयात होते. दरम्यान, पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्याने नागरिकांनी दाखल्यासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे नागरिकांचे विविध तक्रारी आणि सुनावण्या बाकी होत्या. त्यामुळे अधिकारी सकाळपासून व्यस्त होते.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहितीसाठी देखील नागरिक कार्यालयात येत आहेत. या योजनेची नागरिकांना अद्याप व्यवस्थित माहिती नाही. त्यामुळे त्यासाठी लागणारी कागदपत्रे, योजनेचे स्वरूप याची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अद्याप नागरिकांना आवश्यक दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी असलेल्या सेतू कार्यालयात धाव घेतली. तांत्रिक कारणाभावी अनेकांचे दाखले अडकले आहेत. त्यामुळे तहसीलदारांची भेटण्यासाठी हे नागरिक थांबले होते.
आधार कार्ड कार्यालय बंद
निगडी येथील तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावर सेतू कार्यालय आहे. त्याच्या शेजारीच आधार कार्ड सेवा केंद्र आहे. तेथे आधार कार्ड सोबतच गॅझेट व दाखले देतात. दरम्यान, पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या एका तरुणीने दाखला मिळण्यासाठी अनेक हेलपाटे मारले. मात्र हे कार्यालय बंद आहे. संबंधित चालक फोन देखील उचलत नाही, असा तक्रार अर्जदार मनीषा शिंदे यांनी केला आहे.
सिस्टीम डाऊनचा फटका
शालेय प्रवेश प्रक्रिया, पोलीस भरतीसह अन्य पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदारांकडे नाहीत. त्यामुळे त्यांनी सेतू करण्यात अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यांना वेळेत दाखला न मिळणारे ते हवालदिल झाले आहेत.
विविध दाखले आणि योजना संबंधित नागरिक कार्यालयात आले होते. प्रत्येक नागरिकांना आवश्यक ती माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे दाखले वेळेमध्ये द्यावेत, अशा सूचना सेतू कार्यालयास दिले आहेत.
- प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार