संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: गेल्या आठवड्यात मुळशी परिसरात पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडून तीन अवाढव्य होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. ती संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आली दरम्यान, या कारवाईची धास्ती घेतल्यानंतर प्राधिकरणाकडे होर्डिंग मंजुरीसाठी विविध ठिकाणाहून तब्बल दोनशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अर्ज आलेले होर्डिंग बाजूला ठेवून इतरांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
होर्डिंगचे सर्वेक्षण झाल्यानंतर प्राधिकरणाने त्या होर्डिंगधारकांना मंजुरी मिळण्याबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली नाही. तर, अवघे ३० ते ४० अर्ज आले होते. त्यातही होर्डिंगवर कारवाईबाबत प्रत्यक्षात मंजुरी आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे थेट कारवाई होत नव्हती. अखेर निवडणुकीच्या निकालानंतर प्राधिकरणाकडून होर्डिंगवरती कारवाई सुरू करण्यात आली. सर्वाधिक होर्डिंग असलेल्या मुळशी तालुक्यातून कारवाई सुरू केली. गेल्या आठवड्यात या ठिकाणी जवळपास ३ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर कारवाईच्या धास्तीने प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या हद्दीतील होर्डिंगधारक प्राधिकरणात पळत आले. त्यांनी मंजुरीबाबत अर्ज दाखल केलेला आहे.
प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात जवळपास एक हजाराहून अधिक अनधिकृत होर्डिंग आढळून आलेले आहेत. त्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असताना, दुसरीकडे या होर्डिंगना मंजुरी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. मंजुरीसाठी अर्ज आलेल्या होर्डिंगवरील कारवाईबाबत विचार करण्यात येणार आहे. तर, अद्यापही मंजुरीसाठी अर्ज न केलेल्या होर्डिंगधारकांवर इथून पुढे कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, प्राधिकरण अंतर्गत असलेल्या जवळपास १७ हून अधिक गावांनी त्या हद्दीमधील असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी , असे पत्र प्राधिकरणाला दिले होते. त्यात होर्डिंगची संख्या आणि त्याचे ठिकाणही नमूद केले होते. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अनअधिकृत होर्डिंगबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे प्राधिकरणाला कारवाई करण्यासाठी पावले उचलावी लागली होती.
पालखी मार्गावरील होर्डिंग हटवणार
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील असलेले व प्राधिकरणातील हद्दीत समाविष्ट अनधिकृत होर्डिंग प्रामुख्याने हटवले जाणार आहेत. त्यानुसार पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, दिवे घाट, काळेवाडी या परिसरातील होर्डिंग हटवण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यानुसार त्यांना नोटिसा देऊन काढून घेण्याची ताकीद दिली आहे.