पिंपरी-चिंचवड : तब्बल ५८ शालेय वाहनांमध्ये त्रुटी; साडेचार लाखाचा दंड वसूल, आरटीओकडून तपासणीची कारवाई सुरूच राहणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, विनापरवाना शालेय वाहतूक, विनायोग्यता प्रमाणपत्र, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक यासह कागदपत्र नसलेल्या तब्बल ३४ वाहनांवर गेल्या तीन महिन्यांत कारवाई केली. एकट्या जुलै महिन्यात २४ वाहने दोषी आढळली असून कारवाईत साडेचार लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. येत्या काळात शालेय वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील शाळा जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने फिटनेस प्रमाणपत्राबाबत स्कूल बसचालकांना नोटिसा दिल्या होत्या. भोसरी-आळंदी रस्त्यावर स्कूल बस अपघातानंतर आरटीओ पथक ॲक्शन मोडवर आलेले आहे. त्यामुळे नोटिसा देऊनही योग्यता प्रमाणपत्र व इतर अटी पूर्ण नसलेल्या बसचालकांवर कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक बसचालकाने राज्य शासनाने जारी केलेल्या २०११ मधील बस नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे आरटीओने स्पष्ट केले.
शहरात २९५१ स्कूलबसची आरटीओत नोंद आहे. वारंवार नोटीस देऊनही अनेक वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा धोकादायक वाहनातून विद्यार्थी वाहतूक होत असल्याने त्यावर देखरेख ठेवण्याचे काम आरटीओ करत असते. फिटनेस नसताना स्कूलबस रस्त्यांवर दिसल्यास चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसची प्रवासी क्षमता दीडपट असते. त्याहून अधिक मुलांना बसवून दाटीवाटीतून ने-आण करणाऱ्या चालकाला दंड करण्यात येत आहे. दरम्यान, स्कूलबस चालकांना नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, अनफिट स्कूलवर आरटीओचे वायुवेग पथक नजर ठेवून असून ते ग्रामीण भागातही कारवाई करत आहे.