बोगस एजंटांवर होणार कारवाई
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत बोगस मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि एजंटांवर कारवाई करणार असून, कार्यालयातील शिस्त राखली जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे परिवहन कार्यालयाअंतर्गत भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे. हा बदल येत्या काही काळातच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाहन परवाने व इतर कामे अधिकाधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन अधिकारी करण्यात आले. त्यानंतर प्रथमच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संदेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर मुंबई येथील परिवहन विभागातील संगणकीकरणाचाही पदभार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या ठिकाणी अपेक्षित बदल करणार असल्याचे स्पष्ट केले. आरटीओ संबंधित नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि कार्यालयाची शिस्त याबाबत नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
वाहन संबंधित परवाने आणि इतर कामे करण्यासाठी आरटीओमध्ये नागरिक येत असतात. मात्र अनेकदा ते एजंट अथवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडे जातात. दरम्यान, काही बोगस एजंट अथवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून नागरिकांची फसवणूक होऊ शकते. तसेच, पैसे भरून सुद्धा नागरिकांना आरटीओचे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे अशा काही एजंटांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आढावा घेण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रारी अनुषंगाने आणि आरटीओत फिरणाऱ्या बोगस एजंटांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बडगा उचलण्यात येईल. प्रत्यक्षात वाहन परवाने तसेच इतरही कामे नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरटीओत येण्याची गरज नाही.
लर्निंग लायसन्सचा कोटा वाढवला
वाहनचालकांना लर्निंग लायसन्ससाठी थांबावे लागत होते. त्याचप्रमाणे वेळेत अपॉइंटमेंटदेखील मिळत नाही. त्यामुळे आरटीओकडून लर्निंग (शिकाऊ) लायसन्स कोटा वाढवण्यात आला आहे. त्यापूर्वी हा कोटा सव्वा दोनशेच्या आसपास होता. तो आता जवळपास २८५ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परीक्षार्थींचा कोठाही वाढवण्यात आला आहे.
आरटीओतील पार्किंगचा प्रश्न मिटणार
पिंपरी-चिंचवड आरटीओ येथील नागरिकांना पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरती लावण्यात येतात. त्यामुळे आरटीओ कार्यालयालगत वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. दरम्यान, मानव विरहित ब्रेक टेस्ट सिस्टीम बसवण्यात येणार असून, त्याचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर आरटीओमागील सध्या सुरू असलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.