संग्रहित छायाचित्र
सार्वजनिक वाहतूक सेवेचा दुवा असणाऱ्या एसटी महामंडळाने देखील डिजिटलायझेशनची कास धरली आहे. प्रवाशांना सोयीस्कर अशा क्यूआरकोडच्या माध्यमातून तिकीट सुरू झाल्याने रांगा आणि वेळ या दोन्हीची बचत होत असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सेवेचा वापर करण्यात येत आहे. मात्र, या ऑनलाइन सेवेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासी करत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून दिवसाकाठी ७० लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळत आहे
एसटीतही 'क्यूआर कोड'ने तिकिटाची रक्कम अदा करता येत आहे. डिसेंबरपासून ही सुविधा सुरू झाली असून, या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला ऑनलाइन तिकिटाच्या माध्यमातून ७० लाखांचा, तर महिन्याला १७ कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडला असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने सेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये ११ डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यात 'यूपीआय', 'क्यूआर कोड'च्या माध्यमातून तिकीट देण्याची सोय सुरू झाली. या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
तिकीट काढण्यासाठी अथवा चौकशीसाठी एसटी स्थानकावर प्रवाशांच्या मोठा रांगा लागलेल्या पाहण्यास मिळतात. परिणामी, प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांची पाठ फिरत होती. परिणामी, खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे या प्रवाशांचा ओढा झाला होता. मात्र आता सध्याच्या स्पर्धात्मक युगाप्रमाणे एसटीनेही बदल करून ऑनलाइन सेवा दिली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढून उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. ११ डिसेंबर ते ३० जूनपर्यंत २३ लाख ८२ हजार १९६ प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले आहे. यातून एसटी महामंडळाला ५४ कोटी ६३ लाख ४ हजार ४९४ रुपये उत्पन्न मिळाले आहेत. विशेष म्हणजे जून महिन्यात सर्वाधिक ९ लाख प्रवाशांनी ऑनलाइन पेमेंट केले आहे; तसेच दिवसाला ७० लाख उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. ग्रामीण भागातही ऑनलाइन सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध ग्रामीणमध्येही या सेवेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून
दरम्यान, एसटी महामंडळाचे सेवा देणारे ॲप मध्यंतरी ठप्प झाले होते. तिकीट काढणे, पैसे भरणे यासह अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागले. अनेक प्रवाशांनी तिकिटाचे पैसे भरूनही तिकीट मिळाले नसल्याच्या तक्रारी होत्या. तर, ता तक्रारी घेऊन अनेक नागरिक एसटी स्थानकामध्ये दाखलही झाल्या होत्या. त्यामुळे त्या तांत्रिक त्रुटी दूर कराव्या अशी मागणी प्रवाशांकडे होऊ लागली आहे.
इथे येणार तक्रार करता
पैसे गेल्यानंतरही तिकीट न मिळाल्यास तक्रार करता येईल. तिकीट काढताना मशिनवर स्कॅन केल्यानंतर खात्यातून पैसे वजा झाले व तिकीट नाही आले, तर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे. ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच wecare@aritelbank.com या ई-मेलवर तक्रार करू शकतात, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.