पिंपरी-चिंचवड : पालिका, लोकप्रतिनिधींनी झटकली जबाबदारी
पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, याचा फटका सर्वच नागरिकांना बसला. मात्र, पुनावळेतील पुणे-बेंगळुरू हायवेलगत असणाऱ्या सियोना पार्क सोसायटी रहिवासी गेल्या चार दिवसांपासून पावसाळी समस्यांनी त्रासले आहेत. सोसायटी वाहनतळात पार्किंगमध्ये भरलेल्या सुमारे आठ ते दहा फूट पाणी काढण्यासाठी कोणती मदत न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी पाण्यात जाऊन मोटारी लावल्या. एवढेच नव्हे तर भर पावसात तीन दिवस जिल्हा प्रशासन आणि महापालिका या विभागात हेलपाटे मारत आहेत. मात्र कोणीही त्यांची हाक ऐकली नाही. परिणामी, ८० टक्के रहिवासी तात्पुरते दुसरीकडे राहण्यास गेलेले आहेत.
मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या या उच्चभ्रू सोसायटीधारकांची गेल्या तीन दिवसांपासून बिकट अवस्था आहे. आठ फूट पाणी साचल्याने वीज खंडित झाला होता. मोटारी, दुचाकी एवढेच नव्हे तर लिफ्टही पाण्याखाली होती. परिणामी, तब्बल दोन दिवस कोणती सुविधा न मिळाल्याने रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हवालदिल झालेल्या अनेकांनी नाइलाजाने जवळच्या नातेवाइकांकडे किंवा हॉटेलमध्ये आसरा घेतला आहे. आत्ताही जवळपास ८० टक्के कुटुंबीय सदनिका सोडून तात्पुरते बाहेर राहण्यास गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आणि अगदी मोजक्या रहिवाशांच्या मदतीने पाणी काढण्याची वेळ आली.
सोसायटीतील रहिवाशांनी स्वखर्चाने मोटारी आणून या ठिकाणी पाणी ओढले. मात्र अध्याप काही ठिकाणी पाणी बाहेर काढता येत नाही. सोसायटीच्या बाजू असणारी शेतकरी, जागामालक देखील सहकार्य करत नसल्याने येथील रहिवाशांची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे. त्याबाबत कोचीच बोलायला तयार नाही. पुनावळे परिसरात ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईन उभारल्या नसल्याने मोठा फटका रहिवाशांना बसत आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी काढले आहे. मात्र अद्याप रहिवाशांची वाहने आणि अन्य काही वस्तू या पाण्यात भिजल्याने मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून येथील रहिवासी महापालिका, जिल्हा प्रशासन, अग्निशामन त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडे मदतीसाठी हाक मारत होते. मात्र, आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही मदत या सोसायटीला मिळाली नाही. चांगल्या सुविधा आणि प्रशस्त इमारत आहे. मात्र, राहायला आल्यानंतर असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने संताप व्यक्त केला आहे. महापालिकेला हजारो रुपयांचा कर भरतो. त्याचप्रमाणे त्यांचे नियम आणि अटी यादेखील आम्हाला लागू आहेत. मात्र, त्यांची कोणतीही मदत न मिळाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पाणी काढून घेतल्यानंतर अनेक ठिकाणी गाळ आणि चिखल आहे. आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. आता तरी महापालिकेने पुढाकार घेऊन त्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
..तर मतदानावर बहिष्कार
या इमारतीत साडेतीनशेहून अधिक कुटुंबीय आहेत. म्हणजे जवळपास एक हजार नागरिक या ठिकाणी राहतात. मात्र, पायाभूत सुविधा देण्यात न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अद्याप पावसाळा संपला नाही. ही परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे वेळीच याबाबत तोडगा महापालिकेच्या माध्यमातून काढणे आवश्यक आहे. अन्यथा आयुष्यामध्ये मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याबाबत विचार करावा लागेल, अशी खंत या सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त केली.
दरम्यान पाण्याच्या आउटसोर्स व इतर सर्व बाबींची पूर्तता, नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तसे काही झाले नाही. १५ हॉर्सपॉवर एवढ्या क्षमतेच्या चार मोटारी सतत लावून पाणी बाहेर काढले आहे. दोन एकर परिसरात आठ फूट पाणी होते. आता वीज आणि लिफ्ट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून इतरही रहिवाशांना त्रास होणार नाही, असे सोसायटीतील रहिवाशाने सांगितले आहे.