पिंपरी-चिंचवड : उत्पन्नात आघाडी, सुविधांमध्ये मात्र नापास
सर्वाधिक उत्पन्न, विविध मार्गांवर धावणाऱ्या बस, प्रवाशांची मोठी संख्या यासह विविध उपक्रम राबूनही पुणे जिल्ह्यातील एकाही बस स्थानकाचा 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक' अभियानामध्ये समावेश झालेला नाही. बस स्थानकाची दयनीय अवस्था, अस्वच्छता आणि प्राथमिक सुविधा नसल्याने या बसस्थानकांना अभियानात नापास ठरवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व बसस्थानकांसाठी प्रदेश विभागात 'अ', 'ब', 'क' गटात हिंदुहृदयसम्राट 'बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक' अभियान राबवले होते. या अभियानामध्ये चार समित्यांकडून चारवेळा एका बसस्थानकाची तपासणी अर्थात मूल्यांकन केले होते. प्रत्येक स्थानकामध्ये मुंबई, इतर जिल्ह्यातील महामंडळाचे अधिकारी, त्याचप्रमाणे तांत्रिक विभागाचे विश्लेषकही या तपासणी पथकामध्ये होते. महामंडळात प्रवाशांना आवश्यक सुख-सुविधा आणि पाणी, स्वच्छतागृह यासारख्या प्राथमिक बाबी असल्याचे त्यांनी पाहिले. त्याचप्रमाणे बस स्थानकांची स्थिती, अपघातांचे प्रमाण, एसटी स्थानक परिसराचे वातावरण, महिला आणि पुरुष वाहक-चालक विश्रांतीगृह, प्रवाशांच्या तक्रारी आणि बसचे पळणारे किलोमीटर या सर्व बाबींचा त्यांनी अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे स्थानिक आगारातील प्रवासी, प्रवासी संघटना अथवा ज्येष्ठ नागरिक यांचे अभिप्रायही विचारात घेण्यात आले होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही आगारामध्ये अस्वच्छता आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या निदर्शनास आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील एकही बसस्थानक अभियानात अग्रस्थानी राहू शकले नाही. दुसरीकडे पुणे प्रादेशिक विभागात 'अ' गटातून सातारा जिल्ह्यातील फलटण बसस्थानकाने प्रथम आणि दहीवडीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 'ब' गटातून कराड बसस्थानक दुसरे, तर 'क' गटात मेढा प्रथम, औंध द्वितीय आणि पुसेसावळी तिसरे आले. सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एकाही बसस्थानकाचा यात समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती, वागणूक, एसटी स्थानकाचा परिसर या अनुषंगाने बसस्थानकांची तपासणी झाली. प्रवाशांसाठी स्वच्छता, सोयी या बाबींवर मूल्यांकनात भर दिला गेला होता. पुणे प्रादेशिक विभागात सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश होतो.
प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांची वानवा
जिल्ह्यातील वल्लभनगर, स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे ही सर्वाधिक गजबजलेली बस स्थानके आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये वल्लभनगर हे एकमेव आगार असून, दिवसासाठी या ठिकाणी ५० हुन अधिक बस धावतात. नुकतेच आगारात रंगरंगोटी, सिमेंटचा रस्ता आणि देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, प्रवाशांना आवश्यक ती सेवा उपलब्ध नसल्याने हे आगार मागे पडले. जिल्ह्यात अनेक स्थानकांचे उत्पन्न जास्त आहे. पण, नुकत्याच झालेल्या अभियानामध्ये जिल्ह्यातील एकाही स्थानकाला पारितोषिक मिळवता आले नाही. यावरून मोठ्या बसस्थानकांची दैन्यावस्था असल्याचे समोर आली आहे.