पिंपरी-चिंचवड : मेट्रोच्या नावाखाली बेकायदा वसुली !
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पे अँड पार्क पॉलिसी गुंडाळली आहे. तसेच, महामेट्रोच्या ताब्यात असलेल्या पार्किंगवरही अद्याप ती कार्यान्वित झालेली नाही. मात्र, कासारवाडी, नाशिक फाटा येथील उड्डाण पुलाखाली पार्क केलेल्या वाहनचालकांकडून मेट्रो पार्किंग नावाखाली पैसे वसूल केले जात आहेत. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती मेट्रोचे पार्किंग असल्याचे सांगत असून, वाहनचालकांना अडवणूक करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ( पुणे) या दरम्यान मेट्रोला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळालेले आहेत. त्यापटीत महसूल देखील प्राप्त होत आहे. मात्र, प्रवाशांना पायाभूत सुविधा देण्यास मेट्रोला अपयश येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो सुरू होण्यापूर्वी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे नाईलाजाने वाहनचालकांना पदपथ, रस्ता, उड्डाणपुलाखालील मोकळी जागा, प्रमुख चौकात पार्किंग केले जाते. त्यामुळे चौकात बकालपणा आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. विशेष म्हणजे महापालिका आणि मेट्रो यांना प्रवासी कोठे वाहन पार्क करतात, त्याचे काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे मेट्रो चालू होऊन वर्ष झाले तरी पार्किंगची व्यवस्था करता आलेली नाही.
दुसरीकडे, रस्त्यावरती वाहन पार केल्यास वाहतूक पोलिसांचा दंड, तर उड्डाणपुलाखाली अथवा इतरत्र पार्क केल्यास अवैद्य वसुली जोरात सुरू आहे. यावर मात्र कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. कासारवाडी, नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली जागा आहे. या ठिकाणी जवळच सार्वजनिक स्वच्छतागृहदेखील आहे. त्याला लागूनच दुचाकी, मोटारी, टेम्पो अशी वाहने पार्क केली जातात. तेथूनच पुढे मेट्रो, रेल्वे अथवा खासगी ट्रॅव्हल्स प्रवासासाठी सुरक्षित म्हणून येथे वाहन पार्क करतात. दिवसभर तर कधी रात्री उशिरा वाहनचालक येथे वाहन घेण्यास परत येतात. मात्र, या ठिकाणी मेट्रोचे पार्किंग असल्याचे सांगून पैसे आकारले जात आहेत. संबंधित व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचे आयकार्ड अथवा पावती पुस्तक नसल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे वाहनचालकाच्या निदर्शनास आले आहे. मात्र काही नागरिकांना याची माहिती नसल्याने ते पार्किंग वसुलीला बळी पडतात.
वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे घेतले जातात. दिवसभर येथे वाहन लावले. पण, लावण्यापूर्वी असे कोणी सांगितले नाही. येथे कोणत्या प्रकारचे बॅनर, पोस्टर नाही. असे असूनही संबंधित व्यक्ती वाहनचालकांकडून पैसे वसूल करत आहेत. हीच व्यक्ती येथील स्वच्छतागृहाचे पैसेदेखील नागरिकांकडून आकारते. तेथूनच एखादा सर्वसामान्य नागरिक दुचाकी घेऊन पार पडत असताना तो वाहनचालकास अडवतो आणि पैसे वसूल करतो. याबाबत मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
रस्त्यावर वाहने लावल्यास दंडाची नोटीस
वाहनचालक मेट्रोने प्रवास करून कोणती शिक्षा करतात का, असा सवाल प्रवाशांना पडला आहे. कारण, रस्त्यावरती वाहन पार्क केल्यानंतर अनेक वाहनचालकांना हजारो रुपयांच्या दंडाची नोटीस प्राप्त झाली आहे. त्यातच तिकीट तीस रुपयांचे मात्र, दंड हजाराचा, यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत आहे. दुसरीकडे या दंडापासून वाचण्यासाठी कोपऱ्यात पार्क केलेल्या वाहनचालकांकडून अशाप्रकारे सक्तीची वसुली सुरू आहे. यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.
जनसंपर्क विभाग नावाला
महामेट्रोकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, असे आश्वासन वेळोवेळी देण्यात येते. मात्र, जनसंपर्क विभाग अतिशय ढिसाळ असल्याचे दिसून आले. महामट्रोचे कार्यकारी संचालक तथा हेमंत सोनवणे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. दुसरीकडे मेट्रोने स्थापन केलेला जनसंपर्क विभागही नावापुरता संपर्क करतो. प्रवाशांच्या तक्रारी, समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले.
मेट्रो सुरू होण्यापूर्वी पार्किंग होणे आवश्यक होते. तसे न झाल्याने प्रवाशांना वाहने इतरत्र लावावी लागतात. दुसरीकडे, रस्त्यावर पार्क केल्याने धाकधूक दंडाची भीती असते. संध्याकाळी काम उरकून परत येईपर्यंत वाहन हलवलेले असते. अनेकदा वाहनावर पोलिसांकडून दंड आकारला जातो. आता दुसरीकडे अशाप्रकारे बेकादा वसुली होत आहे.- संदीप क्षीरसागर, प्रवासी