संग्रहित छायाचित्र
राज्यात नॅशनल होमिओपॅथी कमिशनद्वारे (एनएचसी) होमिओपॅथी डॉक्टरने ॲलोपॅथीविषयक ब्रीच कोर्स (औषध शास्त्र) केल्यास ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकतात. याच आधारावरती जनजागृती करण्याबाबत राष्ट्रीय आयुष न्याय वैद्यकीय कार्यशाळा २०२४ ही ऐतिहासिक ठरली. या कार्यशाळेत समान संधी होमिओपॅथी ते ॲलोपॅथी डॉक्टर तसेच डॉक्टर साक्ष देताना न्यायालयांमध्ये त्याचे महत्त्व व प्रात्यक्षिक नाट्यरूपात करून दाखवण्यात आले. या कार्यशाळेत २२० डॉक्टर सहभागी झाले होते.
येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नुकतेच राष्ट्रीय आयुष मेडिकोलीगल परिषदेची (२२ आणि २३ जून) दोन दिवसीय परिषद पार पडली. आयुष आणि वैद्यकीय न्यायशास्त्र क्षेत्रातील प्रख्यात व्यावसायिक, विद्वान आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उद्घाटन कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह कुलगुरू डॉ. एन. जे. पवार आणि डॉ. जे. एस. भवाळकर उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून डॉ. डी. बी. शर्मा तसेच, आयोजन सचिव म्हणून डॉ. मिलिंद सोनवणे उपस्थित होते.
होमिओपॅथी डॉक्टरांनी सही केलेली फिटनेस प्रमाणपत्रे आणि इतर अधिकृत दस्तऐवजांना सरकारी एजन्सीद्वारे स्वीकारले जात नाही, याविषयी मुख्य चर्चा करण्यात आली. केंद्रीय अधिनियमात समावेश असूनही असे काय घडते, यावर चर्चा करून नागरी अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुमारे १९० सहभागी डॉक्टरांनी अर्थपूर्ण संवाद साधला, संशोधन निष्कर्ष शेअर केले आणि आयुष सरावातील मेडिकोलीगल तत्त्वांच्या समज आणि अनुप्रयोग सुधारण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचा शोध घेतला.
परिषदेत प्रसिद्ध तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली विविध ज्ञानवर्धक सत्रे, कार्यशाळा आणि पॅनेल चर्चांचा समावेश होता. डॉ. मोहन पवार, लोणीः वैद्यकीय पुरावे गोळा करणे, संरक्षित करणे आणि पाठवणे; डॉ. मधू गोडखिरेकर, गोवाः रुग्णांना संदर्भित करणे आणि वाहतुकीत नैतिक आणि मेडिकोलीगल समस्याः डॉ. राहुल बंड, पुणेः जीवनाच्या शेवटच्या काळातील काळजीत नैतिक आणि मेडिकोलीगल समस्याः डॉ. प्रवीण अरोरा, इंदूरः टेलिमेडिसिन आणि त्याचे कायदेशीर परिणामः डॉ. इंद्रजीत खांडेकर, वर्धाः क्रॉस-पॅथी आणि रुग्णालयांमध्ये आयुष डॉक्टरांचे मेडिकोलीगल परिणाम आणि उपाययोजना यांचा समावेश होता.
राज्य होमिओपॅथी परिषदेच्या विधेयकात सीसीएमपी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्र राज्यात आधुनिक औषधांचा सराव करण्यास अनुमती मिळाली. या व्यतिरिक्त चर्चेत डॉ. धर्मेंद्र शर्मा होमिओपॅथी अभ्यासक्रमात न्यायवैद्यकशास्त्र आणि विषशास्त्र उन्नत करणे; आणि डॉ. महादेव बनसुडे, लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये तपासणी आणि प्रमाणपत्र यांचा समावेश होता
दुसऱ्या दिवशी डॉ. (ब्रिग) रवी राऊत यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची तयारी, खबरदारी आणि प्रतिबंधः डॉ. अंजली दूधगावकर, आरोग्य क्षेत्रासाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील मार्गदर्शन; डॉ. आदर्श कुमार, वैद्यकीय सरावाशी संबंधित कायद्यांमधील अलीकडील बदल आणि सुधारणा आणि डॉ. नरेश जान्जड, कोर्ट प्रक्रिया आणि कोर्टात डॉक्टरांच्या पुराव्याची नोंदणी यांची माहिती दिली. डॉ. निरज डिंगरे, मेडिकोलीगल प्रमाणपत्रे; डॉ. विजय महेंतेश, मृत्यूची घोषणा आणि मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र (एमसीसीडी), डॉ. भालचंद्र चिखलकर, वैद्यकीय सरावासाठी नैतिक मार्गदर्शक तत्त्वेः आणि डॉ. मनोज पाटेकर, वैद्यकीय सरावातील सहमतीचे महत्त्व आणि कायदेशीरता या बाबींवर माहिती दिली.