देहूनगरी दुमदुमली
हातात भगवी पताका, टाळ मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन अन् मुखी हरिनामाचा जयघोष करत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी ( ता. २८ ) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी अंगावर घेत उत्साही, प्रसन्न वातावरणात पालखी मार्गस्थ झाली.
पंढरीची ओढ असणारे हजारो वारकरी, भक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूत भाविकांचे आगमन झाले होते. हातामध्ये टाळ, मृदंग आणि विणेची झंकार करीत वारकरी मग्न झाले होते. फुगड्यांचा फेर आणि पायांचा ठेका धरत आनंद व्यक्त करत होते. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच वारकऱ्यांची लगबग सुरू होती.
पहाटेपासून इंद्रायणी नदीघाटावर स्नान संध्यासाठी भाविक, वारकऱ्यांनी गर्दी केली होती. मुख्य मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे काकड आरतीनंतर शिळा मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर आणि वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते संस्थानचे आजी-माजी विश्वस्त, महाराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते..
पालखी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची अभंगाने भजन मंडपामध्ये सकाळी १० ते १२ काळात भानुदास महाराज मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सकाळी ११ वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका परंपरेप्रमाणे कैलास सोळुंके ( गंगा म्हसलेकर ) यांनी डोक्यावर घेऊन टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माउली, तुकाराम हरिनामाच्या जयघोषात इनामदार वाड्यात आणल्या. दिलीप गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले. दुपारी साडे बाराच्या सुमारास सोळुंके ( म्हसलेकर ) यांनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन टाळमृदंगाच्या गजरात मुख्य मंदिरात आणल्या. मंदिर प्रदक्षिणेनंतर पादुका भजनी मंडपात आणल्या. दुपारी दोनला पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार पंढरीनाथ महाराज तावेर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे यांच्या हस्ते जगद्गुरूंच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. ग्रामोपाध्यायांनी वेदमंत्र पठणाने वरुण, कलश पूजन केले. नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्ष पूजा दिवटे, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, संजय सईद, तलाठी सूर्यकांत काळे, अतुल माने, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, बाळासाहेब काशीद, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त, माजी विश्वस्त, वंशज, ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते. महापूजेनंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. मानकरी, विणेकरी यांचा फेटा, श्रीफळ देऊन संस्थानच्या वतीने सन्मान केला. टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.
खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेताच भाविकांनी, ‘पुंडलिका वरदा हरि विठ्ठल’ नामाचा जयघोष केला. पालखी मंदिरातून बाहेर आणली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेनंतर देहूतील इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात विसावली. पालखी आरतीनंतर रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत म्हातारबुवा खणेपुरीकर दिंडीचे कीर्तन होऊन पहाटेपर्यंत वेणूरकर दिंडीचे जागर सुरू होते.
आज पिंपरी-चिंचवडमध्ये
आज, शुक्रवार म्हणजेच २८ जूनला दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान झाले असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. त्यामुळे येथेही वारकऱ्यांची मोठी गर्दी होती. २९ जूनला दुपारी पिंपरी-चिंचवड शहरात भक्ती-शक्ती चौक येथे दाखल होणार आहे. येथेच महापालिकेतर्फे पालखीचे स्वागत करण्यात येते. हा पालखी सोहळा आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. ३० जूनला पालखी पुण्यात दाखल होणार असून दोन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे.
वारकऱ्यांची अलोट गर्दी
गेल्या महिन्यापासून पालखी सोहळ्याची तयारी केली जात होती. देहूमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वारकरी दाखल होत आहे. पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण देहू सजले आहे. मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडूच्या फुलांच्या माळ्यांनी मंदिर सजवण्यात आले आहे. यंदा पालखीचे ३३९ वे वर्षे आहे. त्यामुळे मंदिर संस्थानानेही जोरदार तयारी केली आहे. पालखीला आणि रथाला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. मंदिरामध्ये टाळ- मृदंगाचा गजर सुरू असून वारकऱ्यांनी भक्ती भावाने पालखी सोहळ्यास उपस्थिती लावली आहे. Wari 2024