चिखली: भिंत फोडल्याने ‘घरकुल’मधील पाणी शेतात
चिखलीतील घरकुल सोसायटीमध्ये साठलेले पाण्याला वाट देण्यासाठी जेसीबीने भिंत फोडली. त्यामुळे हे पाणी बाजूच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस, कृषी आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे सोसायटी उभारताना पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करूनही मोठ्या प्रमाणात पाणी साठले.
चिखली, नेवाळे मळा येथे संतोष नेवाळे यांची शेती आहे. जवळच पालिकेने घरकुल उभारले आहे. पावसाळ्यात इमारतीच्या तळमजल्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. पाणी साचल्याने सोसायटीची भिंत फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून सोसायटीतील पाण्याला वाट मिळेल. जेसीबीच्या साह्याने ही भिंत फोडण्यात आली. पाण्याचा दाब जास्त असल्याने खड्डा पडून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडले. यामुळे नेवाळे यांच्या शेतीमध्ये पाणी घुसले. शेतातील भाताचे रोप, मिरच्या, वांगी, केळीचे जादा पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच फळ झाडांनाही याचा फटका बसला. नेवाळे यांच्या अडीच एकर शेत जमिनीमध्ये पाणी शिरले.
याबाबात नेवाळे म्हणाले की, घरकुल सोसायटीमधील सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. तसेच, त्याची वाहिनीदेखील आमच्याच शेतातून गेली आहे. त्याचा कोणताच मोबदला घेतला नव्हता. त्याची व्यवस्थित देखभाल झाली नसल्याने ती तुंबली आणि सोसायटीच्या तळ मजल्यावर पाणी साठले. जेसीबीच्या मदतीने भिंत फोडण्यात आली. याबाबत जेसीबी चालकाला थांबवले. यानंतर चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून नुकसान भरपाई देण्याबाबत कळवले आहे. राज्य सरकारच्या कृषी अधिकाऱ्यांनीही भेट देऊन पाहणी केली.