संग्रहित छायाचित्र
आळंदी: नगरपरिषदेच्या वतीने झाडे बाजार येथे देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे करताना तिथे असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे ओटे न तोडता काम करावे. त्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्याची मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने केली आहे.
फळभाजी, विक्रेते, टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी बाबा कांबळे यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, शहर अभियंता सचिन गायकवाड,अतिक्रमण अधिकारी अरूण घुंडरे, पाटील यांची भेट घेतली. सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याल्यामुळे प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदीकाठी, झाडे बाजार परिसरात अनेक वर्षापासून फळभाजी विक्रेते, छोटे हॉटेल व्यवसाय करणारे, चहा विक्री करणारे तसेच पथारी, हातगाडीधारक व्यवसाय करत आहेत.
आळंदी नगरपरिषदेतर्फे पार्किंगच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम करताना व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये याबाबत ही मागणी केली. पथारी धारक, फळभाजी विक्रेत्यांना विस्थापित करू नये. त्यांचे ओटे तोडू नये, अशी मागणी व्यवसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या वेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. इंद्रायणीकाठी होणाऱ्या विकासकामांना विरोध करणार नसून प्रशासनाला सहकार्य करू, विकासाच्या नावाखाली गरीब टपरी धारकांवरती अन्याय नको. त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.